धारूर (रिपोर्टर):- आठवडी बाजार बंद असला तरी नगरपालिका प्रशासनाने शेतकर्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी आज शेतकरी चांगलेच संतापले असून जागा उपलब्ध नसल्याने शेतकर्यांनी आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून देत निषेध व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडी बाजार बंद असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहेत. आज धारूरचा बाजार असतो. बाजार बंद असला तरी सोशल डिस्टन्स पाळून नगरपालिका प्रशासनाने व्यापार्यांना जागा उपलब्ध करून द्यायला हवी होती. मात्र नगरपालिकेने शेतकर्यांना भाजीपाला विक्री करून देण्यास विरोध केल्याने संतापलेल्या शेतकर्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकून देत पालिकेचा निषेध केला. या वेळी शिवाजी घुगे, श्रीहरी लांब, अॅड. राजेंद्र चोले, विकास जगताप, सुनिल हंडीबाग, काका गरड, कृष्णा फुले, संदीप जाधव, सिद्धेश्वर चाटे, मोहन लांब यांच्यासह आदींची उपस्थिती होती.