बीड (रिपोर्टर) शहरातल्या मुख्य रस्त्यांसह अन्य भागात असलेल्या मंगल कार्यालयातील विवाह समारंभामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हाभरातील जिल्हा पोलिस उपअधिक्षकांना मंगल कार्यालयाच्या मालकांसोबत बैठक घेऊन स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना देण्याबाबत सांगितले आहे. सूचना देऊनही पार्किंग व्यवस्था न करणार्या मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे संकेतही जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत.
शहरात मोठमोठे मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांना स्वत:ची पार्किंग नसल्यामुळे वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे सर्वसामान्यांना वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. यासंदर्भात थेट पोलीस अधिक्षकांनीच जिल्ह्यातील सर्व डीवायएसपींना सूचना दिल्या असून सर्व मंगल कार्यालये व्यवस्थापकांची बैठक बोलावली आहे. त्यांनी स्वत:ची पार्किंग व्यवस्था करावी. वाहने सुरळीत लावण्यासाठी गार्ड नेमावा, अशा सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत संबंधीत मंगल कार्यालयाच्या मालकांनी सूचना दिल्यानंतरही स्वतंत्र पार्किंग व्यवस्था न केल्यास आणि वाहतूक कोंडी झाल्याची तक्रार आल्यास संबंधीत मंगल कार्यालयावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. डी.जे. बाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यास डीजे ताब्यात घेऊन डीजे मालक व मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचेही जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या वेळी सांगितले.