आठ साल के बाद दिल्ली मनपा मे आप
दिल्ली (रिपोर्टर) 2007 पासून दिल्ली महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व निर्माण करणार्या भाजपाला या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले असून याठिकाणी 133 जागा जिंकून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी दणदणीत विजयी झाली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठ्या प्रमाणावर पराभव झाल्याचे मानण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेच्या प्रत्येक विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येत असल्याने दिल्ली महानगरपालिकेचा पराभव हा नरेंद्र
मोदींच्या खात्यात जमा होत आहे.
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या 250 जागांसाठी मतदान झाल्यानंतर आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आघाडी घेऊन होती. 2007 पासून या महानगरपालिकेवर भाजपाचे निर्विवादीत वर्चस्व आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये भाजपाने 270 जागांपैकी 181 जागा जिंकल्या होत्या. यावर्षी दिल्ली शहर वासियांनी भाजपाला डावलल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांनी निवडणुकीमध्ये प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठमोठे होर्डिंग्ज् लावण्यात आले. मात्र प्रत्यक्षात दिल्लीकरांनी भाजपाच्या पदरात 105 जागा टाकल्या. सदरच्या जागा या एक्झिट पोलनुसार जास्तीच्याच आहेत. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीला 133 जागा देऊन बहुमतामध्ये आणले. काँग्रेसला या ठिकाणी केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले तर अन्य जागांवर 4 नगरसेवक निवडून आले. अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मोदी हरले, केजरीवाल जिंकले. या विजयानंतर दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष साजरा केला.
पंतप्रधानांची फौज निकामी
दिल्ली मनपा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह 17 कॅबिनेटमंत्री, शंभरपेक्षा जास्त आमदार, खासदारांची टिम प्रचारात उतरवली होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्टार प्रचारक आणि स्वायत्त संस्थानांनाही कामाला लावलं होतं. मात्र दिल्लीकरांनी आपली चॉईस ‘पुन्हा केजरीवाल’ दाखवली.
दिल्ली एमसीडीचा इतिहास
दिल्ली एमसीडीमध्ये 2007 पासून भाजपाची सत्ता आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने 270 पैकी 181 जागा जिंकल्या होत्या. तर आपने 48 आणि काँग्रेस 30 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तिन्ही महापालिकेचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच वार्डाची संख्या घटून 250 एवढी झाली होती. अशा स्थितीत आम आदमी पार्टी या निवडणुकीत 133 जागांवर निवडून आली. तर भाजप केवळ 103 जागांवर निवडून आली आहे.
भाजप बी प्लॅनवर
महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास भाजपाने आपला बी प्लॅन तयार ठेवला आहे. त्या परिस्थितीत भाजपाची नजर अपक्ष आणि इतर पक्षांच्या विजयी उमेदवारांवर असणार आहे. भाजपाच्या हायकमांडने दिल्ली भाजपाच्या नेत्यांना अपक्ष आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. भाजपा अन्य नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आतापासूनच तयारीला लागल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.