औरंगाबादच्या 8 जूनच्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातून सर्वाधिक शिवसैनिक जाणार; पुन्हा एकदा आवाज कुणाचा शिवसेनेचीललकारी घुमली
बीड(रिपोर्टर): गेल्या काही दिवसात अडगळीला पडलेल्या शिवसेनेमध्ये अनिल जगताप जिल्हा प्रमुख होताच नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र बीड सह जिल्हाभरात दिसून येत असून 8 जून रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्या मेळाव्यात अधिक अधिक संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित रहावे यासाठी अनिल जगताप यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा विधानसभा मतदार संघात शिवसैनिकांच्या जबरदस्त बैठका झाल्या. या बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसह सर्वसामान्यांमुळे पुन्हा एकदा बीडमध्ये आवाज कुणाचा शिवसेनेचा ही ललकारी ऐकावयास मिळत आहे.
गेले अनेक दिवस बीडसह जिल्ह्यात शिवसेनेला मोठी मरगळ आली होती. कधी काळी आवाज कुणाचा, शिवसेनेचा ही ललकारी शहरासह ग्रामीण भागातल्या कानाकोपर्यातून ऐकावयास मिळायची, मात्र नंतर काही दिवस शिवसेनेचा आवाजच ऐकावयास येत नव्हता. गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर डेरेदाखल झाले. अन् शिवसेनेला शहरासह जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली. पाठोपाठ पुन्हा एकदा शिवसेना पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची माळ अनिल जगताप यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे शिवसेनेचा दबलेला आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला. गेल्या आठ दहा वर्षांपूर्वी अनिल जगताप जिल्हा प्रमुख होते. त्या काळात देता का जाता ही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाड्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यात झाली होती. ही सभा ऐतिहासिक ठरली होती, त्यानंतर आता मराठवाड्यात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत 8 जून रोजी जाहिर मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून लक्षनिय शिवसैनिक उपस्थित राहणार. बीड जिल्ह्यातून अधिक अधिक शिवसैनिकांसह सर्वसामान्यांनी या सभेला उपस्थित रहावे म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या उपस्थितीत बीड, गेवराई, शिरूर या ठिकाणी शिवसैनिकांच्या महत्त्वपुर्ण बैठका झाल्या. या बैठकीला शिवसैनिकांसह सर्वसामान्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बैठकीला मिळालेल्या प्रतिसादाने पुन्हा एकदा बीडमध्ये आवाज कुणाचा शिवसेनेचा! ही ललकारी ऐकावयास मिळाली. शिवसेनेचा आवाज क्षीरसागर-जगताप यांच्या नेतृत्वात बीड शहरासह जिल्ह्यात बुलंद होताना पुन्हा एकदा या निमित्ताने पहावयास मिळत आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा तीन दशकातील राजकारणातला अनुभव विकासाभिमुख दृष्टी आगामी काळात बीडसह मराठवाड्यात शिवसेनेला कामी येणार आहे. तर अनिल जगताप यांचे संघटन कौशल्य बीडसह जिल्ह्यात आगामी निवडणूकांमध्ये शिवसेनेला कामाला येणार आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा ऐटीत डोलणार असल्याचा विश्वास या बैठकांमधून शिवसैनिकांनी व्यक्त केला. 8 जूनला मराठवाड्यातून सर्वाधिक शिवसैनिकांसह सर्वसामान्य औरंगाबादमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यास उपस्थिती दर्शवणार असल्याचे सांगण्यात येते.