येत्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी किती निधी मिळणार?
बीड (रिपोर्टर) वदर्भ-मराठवाड्यास पश्चिम महाराष्ट्रास जोडणार्या नेवासे-शेवगाव तालुक्यांच्या दृष्टीने विकासाची धमनी ठरणार्या बेलापूर (श्रीरामपूर) ते बीड- परळी लोहमार्गाचे काम शंभर वर्षांनंतरही रेंगाळलेलेच आहे. या लोहमार्गासाठी लागणारी जमीन संपादित होऊन भरावाचे काम पूर्ण झाले आहे. लोहमार्गाचे काम पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. बीडच्या रेल्वेचं स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. प्रत्येक निवडणुकीत पुढार्यांनी नुसते आश्वासन दिले मात्र त्याची पुर्तता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. येत्या अर्थसंकल्पात बीडसाठी किती निधी मिळणार आणि बीडचा प्रकल्प कधी पुर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर बेलापूर ते बीड हा रेल्वेमार्ग रद्द करण्यात आला आहे.
ब्रिटिशांनी 1922 मध्ये दळणवळणाच्या दृष्टीने, अत्यंत कमी खर्चिक असणार्या रेल्वेमार्गास मंजुरी देऊन जमीन अधिग्रहण करीत 1966 मध्ये माती भरावाचे काम पूर्ण केले. त्यानंतर मात्र लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने, शंभर वर्षांनंतरही रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गाच्या पूर्णत्वासाठी कुकाणे येथील कृती समितीने 2017-18 मध्ये उपोषण, आत्मदहन आंदोलन केले. यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल गेल्या जूनमध्ये केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे.
या रेल्वेमार्गामुळे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी आदी तालुके रेल्वेशी जोडले जाणार आहेत. तसेच, जागतिक तीर्थक्षेत्र असलेले शिर्डी ते तिरुपती बालाजी हे अंतर साडेपाचशे किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे इंधन, पैसा व वेळची बचत होणार आहे. रेल्वेमार्गासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या निम्म्या सहभागाचा प्रस्ताव मार्च 2019 मध्ये दिलेला आहे. या रेल्वे मार्गामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळून रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत, तसेच साखर कारखानदारीलाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या मार्गावर आठ ते दहा साखर कारखाने, फळे- भाजीपाला- दूध व्यवसाय असल्याने, रेल्वेलाही मालवाहतुकीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. या मार्गाचा अहवाल डिसेंबर 2018 मध्ये रेल्वे मंडळाकडे केंद्रीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. मात्र, त्यात काही त्रुटी निर्माण झाल्याने अहवाल पुन्हा मुंबई कार्यालयात पाठविण्यात आला. त्रुटी पूर्ण करून जून 2022 मध्ये पुन्हा अहवाल केंद्रीय मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा लोहमार्ग केंद्रीय मंजुरीच्या (पान 7 वर)
प्रतीक्षेत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये होणार्या अर्थसंकल्पामध्ये या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंजुरी मिळून निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी नेवासे व शेवगाव तालुक्यातील जनतेकडून होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेमंत्र्यांची दिल्लीत भेट घेऊन केंद्रीय निधीच्या मंजुरीची मागणी करणार आहे. बीडच्या रेल्वेचं स्वप्न अनेक वर्षापासूनचा आहे. हे स्वप्न कधी सत्यात उतरणार ? असा नेहमीच प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आष्टीपर्यंत रेल्वेचं काम झालं असलं तरी परळीपर्यंत रेल्वेचे काम पुर्ण व्हायला बराच अवधी लागू शकतो. 2024 पर्यंत तरी काम पुर्ण होते की नाही, असं वाटू लागलं. येत्या अर्थसंकल्पात बीडला किती निधी मिळेल याकडे बीडकरांचे लक्ष लागून आहे. नियोजीत बेलापूर-बीड हा 2 हजार 740.29 कोटींचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.