बीड (रिपोर्टर) नोकरी आणि बदली प्रक्रियेत बनावट अपंग प्रमाणपत्र जोडून बोगसगिरी करणार्या 26 शिक्षकांना निलंबनाचा दणका आज सीईओंनी दाखवला. त्यामुळे सुरुवातीला बोगसगिरी करणार्या 52 शिक्षकांनंतर पुन्हा या 26 शिक्षकांवर झालेल्या कारवाईमुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ माजलेली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षक हे बोगसगिरी करतात. काही शिक्षक शाळेला दांड्या मारतात तर काही शिक्षक रजा लिहून ठेवतात. दुसर्या दिवशी लिहून ठेवलेली रजा फाडून टाकून पुन्हा सही करतात, अशा एक ना अनेक बोगसगिरीचे प्रकार प्राथमिक शिक्षकांकडून होतात. शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये आहे ते ठिकाण मिळावे किवा बदली प्रक्रियेमध्ये सुरुवातीला नंबर लागून सोयीचे ठिकाण मिळावे म्हणून 336 शिक्षकांनी अपंगाचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले होते. सीईओ पवार यांना शंका आल्याने या सर्व प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करून त्यामध्ये अंबाजोगाई येथील मेडिकल बोर्डात तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला 52 शिक्षकांच्या अपंगाच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात प्रचंड प्रमाणात कमी टक्केवारी आली तर काही काहींची निल आली. त्यांच्याकडून फेर सुनावणी घेऊन खुलासे मागवून त्यांना निलंबीत केले. त्यानंतर काल पुन्हा अंबाजोगाईच्या मेडिकल बोर्डाकडून 26 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांचा अहवाल आला. या अहवालातही प्रमाणपत्रांमध्ये अपंगत्वाची टक्केवारी प्रचंड कमी आली. या शिक्षकांना आज सकाळी निलंबीत करण्यात आले. या 26 शिक्षकांमध्ये हरीभाऊ रामदास गोरवे, रहेमोद्दीन नजीरोद्दीन सय्यद, महेश बळीराम नरवडे, शीतल तुकाराम जावळे, जयराम विश्वनाथ मांगडे, पवनराज भगवानराव देशमुख, आशाबाई भगवान आरगड, आप्पासाहेब नामदेव भोसले, स्वाती आसाराम भोंडवे, अर्चना कचरू टाकणखार, विजय बाळासाहेब गर्जे, रखमाजी ज्ञानोबा कोल्हे, रमेश तुळशीराम डोरले, निर्मला प्रल्हाद साळुंके, शंकर किसनराव देवकते, गंगाधर निवृत्ती कांबळे, अंगद कोंडीबा घुले, संजय ज्ञानोबा पांडुळे, अब्दुल करीम अब्दुल गफ्फार, प्रकाश बलभीम भोसले, रामदास लिंबाजी साबळे, अर्चना उत्तमराव धोंडे, वनिता तुकाराम जाधव, परमेश्वर आसाराम बिडवे, प्रियंका श्रावण केदार आणि गोडसे सुमित्रा तुकाराम यांचा समावेश आहे.