मुंबई (रिपोर्टर) ’राज्यात गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप आता सत्ताधारी पक्षातील काहीजण करत आहेत. त्यासाठी अधिकार्यांचे दाखले देत आहेत. मात्र, मी आतापर्यंत सत्तेत असताना कधीही कोणालाही त्रास दिलेला नाही’, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
मविआ सत्तेत असतात मुंबईच्या पोलिस आयुक्तांना मला अडकवण्याचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यालाच अजित पवारांनी हे प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.आज पुण्यात पत्रकारांशी अजित पवारांनी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, सध्या तपास यंत्रणाकडून राज्यात सुरु असलेल्या वेगवेगळया कारवाया पाहता सुडाचे राजकारण सुरु असल्याचे दिसते. राजकीय द्विेषातून कोणी कोणाला त्रास देऊ नये या मताचा मी आहे. काही सत्ताधारी आता मविआने आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करतात. मात्र, मी सत्तेत असताना कधीही कोणालाही त्रास दिला नाही. सर्वांना कायदा, संविधान समान आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करुन पुढे गेले पाहिजे.