नवी दिल्ली (वृत्तसेवा) अदानींच्या मुद्द्यावरुन सर्व विरोधकांनी संसदेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. सध्या अर्थसंकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल त्यानंतर अदानींबाबत चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटल्यानंतर विरोधकांकडून सदनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. गदारोळानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
अदानींच्या मुद्द्यावरुन आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत सकाळी विरोधकांची बैठक देखील झाली. या बैठकीत 16 पक्षाचे नेते सहभागी झाले होते. खर्गे यांच्या कक्षात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय (एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), केसी (थॉमस) आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.