अज्ञातांनी बसस्थानकातून थेट चमनमध्ये नेले
महिलाही नशा करत असल्याचे समोर
वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई
बीड (रिपोर्टर) तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नशेखोरांनी केलेल्या बलात्काराच्या घटनेने शहरात खळबळ उडाल्यानंतर रात्री पुन्हा असाच प्रकार घडल्याने बीड शहरात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. रात्री पुन्हा शहरातल्या यशवंतराव चव्हाण चमन उद्यानात एक महिला अर्धनग्न व शुद्ध हरपलेल्या अवस्थेत दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मात्र तिच्या अंगावर पुर्ण कपडे असल्याचा दावा केला. या घटनेनंतर सदरची महिला ही दारू पिलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून तिच्या सोबत कुठला अनुचीत प्रकार घडला का? याबाबत ती अद्याप तरी माहिती देत नाही, त्या महिलेस मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे, काल रात्री बीड बसस्थानकामध्ये एक 35 वर्षीय महिला नशेच्या अवस्थेत होती. त्या महिलेची ती अवस्था पाहून दोन ते तीन अज्ञात लोकांनी त्या महिलेस तुझा पती तिकडे थांबला आहे, असे खोटे सांगून तिला थेट शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये नेले. त्याठिकाणी तिच्या जवळचा मोबाईल काढून घेतला, इथपर्यंतची माहिती संबंधित महिलेने पोलिसांना दिली. मात्र रात्रभर तिच्यासोबत काय झाले? हे दुपारी एक वाजेपर्यंत संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले नाही. विशेष म्हणजे सदरील महिलाही नशा करते, आज पहाटेच्या दरम्यान सदरची महिला ही चमन उद्यानाध्ये अर्धनग्न अवस्थेत असल्याची माहिती काहींनी पेठबीड पोलिसांना दिली होती. पेठ बीड पोलिसांनी तिला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. लोकांच्या माहतीनुसार ती अर्धनग्न अवस्थेत होती, परंतु पोलिस मात्र ती अर्धग्न नव्हती, तिच्या अंगावर पुर्ण कपडे असल्याची माहिती देत असली तरी खरा प्रकार काय आहे हे गुलदस्त्यात आहे. दरम्यान गेल्या 15 दिवसांपूर्वी बीड शहरात अल्पवयीन नशेखोराकडून अवघ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेबद्दलचा संताप अद्याप शमलेला नसताना रात्री दुसरा प्रकार घडला. सदरच्या पिडित महिलेस जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून तपासणीनंतर तिच्या सोबत अनुचीत प्रकार घडला आहे का हे कळेल. या प्रकरणी आम्ही शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महिला अथवा तिचा पती ज्या आशयाची फिर्याद देईल तशी फिर्याद घेऊ, अथवा वैद्यकीय तपासणीनंतर या प्रकरणी अधिक स्पष्टतेने बोलू, परंतु सदरची महिला जर अर्धनग्न अवस्थेत पोलिसांना आढळून आली असेल तर हे प्रकरण अधिक गंभीर असून शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येते.
हद्दीचा वाद सोडा, सत्य बाहेर काढा
आम्हाला आश्चर्य वाटतं अन् संतापही येतो, एका महिलेला बसस्थानकातून चमनमध्ये घेऊन जाण्यात येते, चमन पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बसस्थानक शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत. सदरची महिला ही अर्धनग्न अवस्थेत असल्याचे लोक उघड सांगतात, पोलीस मात्र त्यावर पांघरुण घालतात, केवळ आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून जबाबदार अधिकारी पोलीस ठाण्यात नसतात. एवढी मोठी घटना घडलेली असतानाही त्यातला सत्य तात्काळ बाहेर येत नाही. बस्स एसपी नंदकुमार ठाकूर, महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नको. हद्द कोणाचीही असो ज्या पोलिसांना प्रकरण समजेल त्याने तात्काळ त्याचा पाठपुरावा करायलाच हवा, या प्रकरणातलं सत्य तात्काळ बाहेर यायलाच हवं.