बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेवर प्रशासक असला तरी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनांच्या कामांना येत्या दोन दिवसात प्रशासकीय मंजुर्या दिल्या जातील आणि कामाची लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.
बीड जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दलित वस्तीमध्ये रस्ता, नाली, या वर्षी नव्यानेच वाचनालयाचे बांधकाम आणि वाचनालय सुरू करणे, अभ्यासिकासाठी या योजनेतून पुस्तके उपलब्ध करून देणे आणि पथदिवे या कामाला दोन दिवसात प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. याबाबतचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून या निधीतून वंचीत असलेल्या वस्तीलाच निधी देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या वस्तींमध्ये योजनेतून काम झालेले नाहीत, अशा वस्तीतील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. याच वर्षी नव्याने सुरू झालेल्या अभ्यासिका, वाचनालय व वाचनालयाचे बांधकाम याबाबतचे प्रस्ताव मात्र करण्याकडे ग्रामपंचायतींचा कल दिसून येत नाही. अनेक ग्रामसेवकांचे या योजनेसाठी उद्बोधन करण्यासोबतच दलित वस्तीती प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचेही सोळंके यांनी सांगितले.