गणेश सावंत । बीड
सत्ताकारणाच्या बेरजेसाठी राज्या राज्यात चेहरे आणि मोहरे निवडणारे मोदी-शहा सह्याद्रीच्या महाराष्ट्रात फडणवीसांचा चेहरा देताना चुकले का? यावर भाजपाच्या अंतर्गत गटबाजीत सातत्याने चर्चा होते. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांनाच अनन्यसाधारण महत्व का द्यायचे, याचे उत्तर रात्रीच्या ‘रहस्यसभेत’ मिळालेल्या भाजपाच्या अभुतपूर्व यशातून मिळते. त्यामुळे बहुजन चेहरे असलेले एकनाथ खडसे भाजपातून बाहेर गेले काय, पंकजा मुंडेंसारख्या ओबीसी नेत्या रुसून बसल्या काय किंवा अन्य ओबीसी बहुजन नेते महाराष्ट्र नेतृत्वाविरुद्ध बोटं मोडत राहिले काय याचं सोयरसुतक ना राज्य भाजपाला आहे ना राष्ट्रीय नेतृत्वाला राज्य सभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात काल जी फडणवीसांकडून खेळी खेळली गेली आणि त्या खेळीत भाजपाला जे यश मिळाले ते राष्ट्रीय भाजप नेतृत्वासाठी फडणवीसांचे नेतृत्वगुण ‘संधीच्या सोन्या’पेक्षा अधिक चकाकी देणारे ठरले.
राज्य सभेच्या सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीचे 33 मते मिळाल्याने महाविकास आघाडीचे मते घटले. हे उघड होत असतानाच भाजपाचा कडवा विरोधक असलेला शिवसेना पक्ष याचा उमेदवार पडला हे भाजपासाठी अधिक महत्वाचे आणि तो केवळ देवेंद्र फडणवीसांच्या गनिमी काव्यामुळेच चितपट झाला. यापेक्षा अधिक महत्वाचे ते भाजपासाठी काहीच नाही. 25 वर्षे भाजप-शिवसेना गळ्यात गळे टाकून राहिले. 2019 च्या निवडणुकीत मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपापासून अलिप्त झाली अन् काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रतिस्पर्धी विरोधकांसोबत जावून राज्यात सत्तास्थानी गेली. हे दु:ख राष्ट्रीय भाजप नेतृत्वाबरोबर राज्याच्या भाजप नेत्यांना अधिक आहे. म्हणूनच गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात विरोधी पक्ष म्हणून राहिलेल्या भाजपाने कधीही लोकहिताचे, जनहिताच्या निर्णयावर ओरड करण्यापेक्षा राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडेल कसं यावर तारखा देणे एवढेच अधिक महत्वाचे त्यांना वाटत गेले. अशा स्थितीत शिवसेनेच्या चारही मुंड्या चित्त करणं देवेंद्र फडणवीसांना या निवडणुकीत जमलं. ते भाजपासाठी अनन्यसाधारणच.
जेव्हा 2019 साली महाविकास आघाडीने विश्वास मत जिंकले तेव्हा त्यांच्याकडे 170 आमदार होते. त्यापैकी नवाब मलिक, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहे तर शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाले आहे. याशिवाय पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला. त्यामुळे 2019 च्या विश्वासदर्शक ठरावाच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे 166 आमदार आहेत. हे झाले कागदावरचे समिकरण तर 2019 मध्ये तटस्थ राहणार्या एमआयएम व माकपने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आघाडीकडे पहिल्या पसंतीचे 169 मते असायला हवी होते. परंतु प्रत्यक्षात 161 मते मिळाली. मग 2019 मधील विश्वासदर्शक ठरावावेळी एमआयएमचे दोन, मनसेचा एक व माकपचा एक असे चार आमदार तटस्थ राहील्यानंतर 288 पैकी 170 आमदार महाविकास आघाडीकडे होते. याचा अर्थ 114 सदस्य भाजपाच्या बाजुने होते. त्यात भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले 105 आणि इतर 9 आमदार मधल्या काळात पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपाने जिंकली, भाजपाचे संख्याबळ 106+9 असे 115 झाले. राज्यसभा निवडणुकीत मनसेचा एक आमदार मतदानासाठी भाजपाकडे आला. तेव्हा ते संख्याबळ 116 झाले. म्हणजेच भाजपाच्या 3 उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची 116 मते मिळायला हवी होती, प्रत्यक्षात अनिल बोंडे, पियुष गोयल यांना प्रत्येकी 48 व धनंजय महाडीक यांना 27 अशी एकूण 123 मते मिळाली. म्हणजेच महाविकास आघाडीकडील 7 मते वजा होऊन ती भाजपाच्या उमेदवाराकडे गेली. असे आकड्यातून स्पष्ट होत असतानाच शिवसेनेचे संजय राऊत यांनी शब्द देऊन फुटलेल्या मतांची थेट नावेच सांगितली. पहिली पसंत आणि दुसर्या पसंतीत घोडाबाजार झाला. असे संजय राऊत यांचे म्हणणे असले तरी बहुजन विकास आघाडीचे तीन मते, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे, स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार या सहा जणांनी शिवसेनेला दगा दिल्याचे म्हटले. आता विषय एवढाच भाजपाच्या अंतर्गत गटबाजीत जे कोणी फडणवीसांचे विरोधक असतील त्यांनी अक्षरश: देवही पाण्यात ठेवले तरी राष्ट्रीय भाजप नेतृत्व फडणवीसांच्या हातून महाराष्ट्र दुसर्याच्या हाती देण्याची सुतराम शक्यता नाही. जिथं मोदी-शहांना आव्हान दिलं जातय आणि ते आव्हान पेलवत जो भाजपाचा नुमाइंदा भाजपाला यश मिळवून देतो, तिथं त्या नुमाइंद्यांचे लंगोटही बांधण्याचे काम मोदी-शहा करतात. याचाच अर्थात त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतात. आता भाजप बहुजन विरोधी आहे, बहुजनांच्या नेत्यांना ते अडगळीला टाकतात हा सूर आवळणे अंतर्गत गटबाजीचे चित्र रेखाटण्यासारखे असले तरी रहस्यसभेतला विजयश्री खेचणारा देवेंद्र भाजपातला हिरो ठरताना दिसून आला. ही सहावी जागा जिंकताना भाजपाने नुसत्या विश्वासाच्या जोरावर मतं खेचली असतील, असं नाही. घोडाबाजार झाला असेल, खरेदी-विक्री झाली असेल, साम-दाम-दंडाचा वापर केला असेल, यावर चर्चा, खलबते, निती-अनिती यावर भाष्य जरी होणार असले तरी भाजपात आता फडणवीसच भारी, हे मात्र त्रिवार सत्य नाकारता येणारे नाही.