मुंबई (रिपोर्टर) जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.
प्रवासी गाढ झोपेत असतानाच अनर्थ, मुंबईच्या ढोलताशा पथकाची बस 150 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या अपघातात 13 जणांना प्राण गमवावे लागले. लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोरेगावचे बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमाला गेले होते. तिथून मुंबईला परत येत असताना काळाने घाला घातला. पथकातील दोघे जण खोपोलीला राहत होते. त्यांना सोडण्यासाठी बसने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर डावीकडे वळण घेतले. बोरघाटात झालेल्या अपघात 13 जणांनी प्राण गमावले, तर खोपोलीत राहणारे ते दोघेही जण सुरक्षित आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज पहाटे खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सकाळपासून कामोठे येथील चॠच् रुग्णालय येथे थांबून होते. जखमी रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही उदय सामंत यांनी दिले. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.