Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeराजकारण...तोपर्यंत धर्मयुद्ध टाळणार- पंकजा मुंडें

…तोपर्यंत धर्मयुद्ध टाळणार- पंकजा मुंडें


पंकजा म्हणाल्या, राजीनामे मागे घ्या मला खुर्चीच्या सत्तेची लालसा नाही, मला दिल्लीत कुणी झापलं नाही, वंचितांसाठी राजकारणात आले, प्रितम म्हणजे परिवार नाही, तुम्ही सर्व माझ्या परिवारातले, मी कुणाला भीतही नाही, परंतु संस्काराचे राजकारण करते
मुंबई/बीड (रिपोर्टर):- मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचितांसाठी काम केले, तळागाळातील लोकांना राजकारणात आणले, त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, मला फक्त परळीची आमदारकी मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा वारसा चालविण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारणात आणलं नाही. वंचितांच्या बाजुने प्रस्थापीतांविरोधात लढण्यासाठी राजकारणात आणलं. मी कधी मला मंत्री करा, आमदार, खासदार करा, मंत्री करा म्हणले नाही. हा माझा राजकारणाचा पाया नाही. दिल्लीत मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झापलं नाही, सन्मानाची वागणूक दिली. आपला उद्देश हा सकारात्मक आहे. मी तुम्हाला राजीनामा द्यायचे सांगितले नाही, तुमचे राजीनामे मी नाकारते, असे म्हणत पांडव चांगले होते म्हणून त्यांनी धर्मयुद्ध नाकारले, मीही जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पंकजा मुंडेंनी नाराजीनामे मागे घेण्याचे आदेश देत आपली भूमिका मांडली.


खा.प्रितम मुंडेंना केंद्रिय मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आल्याने बीडसह राज्यातील अनेक भागात भाजपा पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन मुंबईत डेरेदाखल झालेल्या पंकजा मुंडेंनी आज समर्थकांची वरळीत भेट घेतली. या वेळी समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी करत महाराष्ट्राचा नेता कैसा हो, पंकजाताई जैसा हो, कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीन आली, परत या परत या गोपीनाथराव परत या, गोपीनाथ मुंडे अमर रहे या घोषणा दिल्या. वरळीच्या कार्यालयाच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करून व्यासपीठ तयार करण्यात आले होते. त्या व्यासपीठावर पोहचल्यानंतर पंकजा मुंडेंनी घोषणा देणार्‍या समर्थकांना शांत करत कार्यकर्त्यांसमोर मी नतमस्तक होते, तुमचे ऋण मी फेडू शकणार नाही, असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. गोपीनाथराव मुंडे यांनी वंचितांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगून मला फक्त परळीची आमदारकी मिळवून देण्यासाठी किंवा त्यांचा वारसा चालवण्यासाठी मुंडे साहेबांनी राजकारणात आणलं नाही. वंचितांच्या बाजुने प्रस्थापितांविरुद्ध लढण्यासाठी मला राजकारणात आणलं. मी कधी मला मंत्री करा, मला आमदार करा, असं म्हटलं नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी मी कधी अपेक्षा ठेवली नाही, तो माझा राजकारणाचा पाया नाही. केवळ प्रितम मुंडे म्हणजे माझा परिवार नाही तर राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार आहे. मुंडे साहेबांनी भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात व्हावा म्हणून संघर्ष यात्रा काढली. केंद्रात मंत्रिपद मिळावं म्हणून नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक लोक माझ्यासाठी राजीनामा द्यायला तयार होते. मला पदाची आणि सत्तेची लालसा नाही. मी तुमचे सर्वांचे राजीनामे नामंजूर करते, ते मी द्यायला सांगितले नव्हते. दबाव आणायचाच असता तर ही जागा मला पुरली नसती. दिल्लीत माझी अनेकांशी चर्चा झाली पण इथे मला झापल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. माझ्या चेहर्‍यावरून असं वाटतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याच्या सूचना दिल्या. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सर्व काही झालं, आता मी दबाव आणून काय करणार? माझ्या समाजातील किंवा तळागाळातील कोणी कार्यकर्ता मंत्री होत असेल तर मला दु:ख का व्हावं? असा सवाल करत मोठा नेता नेहमी त्याग करतो, मुंडे साहेबांनी तेच केले. पक्षाने मला जे दिले ते मी लक्षात ठेवील. पण नाही दिले ते मला सल्ला देणार्‍यांनी लक्षात ठेवावा. केेंद्रिय मंत्रिपद मिळालं नसला तरी आज मी पक्षाची राष्ट्रीय मंत्री आहे. मला प्रवास खडतर दिसतो, मागेही होता, आताही आहे. मी संपलेले नाही, संपले असते तर मला संपवायचे प्रयत्न संपले असते. योग्य निर्णय घेण्याची वेळही योग्य असते. अविचाराने काही करायचं नसतं. पुर्ण पात्रता असताना प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नाही, आज आम्ही चाळीशीत आहोत. डॉक्टर कराड पासष्ट वर्षांचे आहेत, त्यांना मी अपमानित का करू? माझ्या विरोधात बातम्या पेरल्या जातात, कोणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, हे चालतं का? एकदा वाघीन म्हणता, कधी पंख छाटले म्हणता, नेमके काय? असे म्हणत कौरव आणि पांडवांची कथा त्यांनी सांगितली. कौरवांनी पांडवांना पाच गावही दिले नाही तेव्हा पांडवांनी युद्ध केवळ लोकांना त्रास होईल म्हणून केलं नाही. धर्मयुद्ध करताना लोकांचा विचार केला जातो. मीही तेच करते. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून पंकजांनी इशारा वजा वक्तव्य केलं. माझा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत, नड्डा आहेत. हे प्रकर्षाने सांगून पंकजांनी नाराजी नाम्यावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले.
तुमच्या डोळ्यातलं
पाणी कसं पाहू!

माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले मग मी तुमच्या डोळ्यातलं पाणी कसं पाहू शकेल? असे म्हणत पंकजा मुंडेंनी उपस्थित कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील समर्थकांना राजीनामे परत घेण्याचे आदेश दिले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!