सोन्याचे दागीने लूटले, घटनास्थळी कुमावतांची भेट
श्वान पथकाला पाचारण, परिसरात भितीचे वातावरण
अमजद पठाण । नेकनूर
अंजनवतीच्या संत विप्र तुकाराम संस्थान मंदीरात रात्री चोरट्याने धुमाकूळ घालत दोन महिलांना धारदार शस्त्राने जबर मारहाण करुन त्यांच्या जवळील दिड तोळ्याचे दागीने व काही रक्कम जबरीने लूटून नेली. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नेकनूर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी महिलांना बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत सह नेकनूर पोलीस दाखल झाले होते. श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून विप्र तुका मंदीरात चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळाने परिसरामध्ये प्रचंड दहशत आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेकनूर ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती येथील संत विप्र तुकाराम मंदीर संस्थान आहे. या ठिकाणी पुजारी कृष्णा जोशी त्यांच्या सासू उषा प्रल्हाद लेले व पत्नी गिता जोशी हे तिघे जण राहतात. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयाने संस्थानमध्ये येवून धुमाकूळ घातला. पुजारी कृष्णा जोशी यांच्या रुमला बाहेरुन कडी लावून त्यांच्या शेजारच्या रुममध्ये झोपलेल्या गिता जोशी व उषा लेले यांना धारदार शस्त्राने मारहाण करुन त्यांच्या जवळील दिड तोळे सोन्याचे दागीने व घरातील काही रक्कम जबरदस्तीने लूटून नेली. यामध्ये दोन्ही महिला गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना बीडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलीस ठाण्याचे एपिआय शेख मुस्तफा, स्थानीक गुन्हे शाखेचे भगतसिंग दुल्लत, नेकनूर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, शेख इसाक, हवलदार राख, नागरगोजे, सचीन डिडुळ यांनी घटनास्थळी धाव घेवून सर्व घटनेची पाहणी करुन पंचनामा केला. चोरट्यांचा तपासासाठी श्वान,फिंगर पथकाला पाचारण करण्यात आले होते. जखमी महिलांचा नेकनूर पोलीसांनी जबाब नोदवून घेतला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.