बीड, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज, वडवणी, पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या मतदान
बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून मातब्बरांच्या अस्तित्व आणि प्रतिष्ठा उद्या मतपेयीत बंद होणार असल्याने जिल्हाभरात मातब्बरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून खडा पहारा पहावयास मिळत आहे. एक एक मतदानासाठी मतदारांचे उंबरे झिजवले जात असून आपल्यालाच मत मिळावे यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा केली जात आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष असून काका-पुतण्याच्या लढाईत बाजी कोण मारणार यावर जोरदार चर्चा होत असतानाच आ. संदीप क्षीरसागरांच्या कडव्या आव्हानापुढे काकांचा निभाव लागेल की काका आपल्या अनुभवाच्या जोरावर पुतण्याचे आवाहन मैदानाबाहेर फेकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. उद्या मतदाना दरम्यान अनुचीत प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त ठेवणार आहेत.
कधी नव्हे एवढी चुरस यावर्षी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्द भाजप अशी एकीकडे लढत असतानाच प्रस्थापीत आणि मातब्बरांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिशी अन्य पक्ष उभे राहिल्याचे चित्र अनेक मतदारसंघात पहावयास मिळत आहे. बीड तालुक्यामध्ये काका-पुतण्याची लढाई अधिक रंगतदार होत असून पुतणे संदीप क्षीरसागर यांना भाजप, काँग्रेस, शिवसंग्राम आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाने पाठिंबा देत युती केल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना आव्हान पेलवणे मुश्किल झाले आहे. आजची रात्र ही वैर्याची रात्र समजून दोन्ही गटाकडून खडा पहारा पहावयास मिळत असून एक एक मतदारांपर्यंत जाण्यासाठी आणि त्यांचे मत आपल्याच पॅनलला मिळावे यासाठी दोघांकडूनही अटकेपार प्रयत्न केले जात आहेत. गेवराई, परळी, अंबाजोगाई, या तीनही बाजार समितींवर राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून येत असून माजलगाव बाजार समितीतही आ. सोळंकेंचे पारडे जड असल्याचे पहावयास मिळते तर तिकडे पाटोदा धसांच्या दबदब्यात आहे. उद्या या आठ बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान होणार असून मातब्बरांचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा मतपेटीत बंद होणार आहे. मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.