नाळवंडीतील दुर्दैवी घटना; पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, गावात खळबळ, घटनास्थळी पोलीस, तपास सुरू
बीड (रिपोर्टर) तालुक्यातील नाळवंडी येथे आज सकाळी धक्कादायक घटना समोर आली. पत्नीचा मृतदेह खाली जमीनीवर तर पतीचा मृतदेह घरातील एका खोलीत लटकताना दिसून आल्याने खळबळ उडाली असून पत्नीची हत्या करून पतीने गळफास गेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस काढत आहेत. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना होताच घटनास्थळी पिंपळनेर पोलिसांनी धाव घेतली. मयत दाम्पत्य हे शेतकरी कुटुंब असल्याचे सांगण्यात येते. त्यांना दोन अपत्य असल्याचेही सांगीतले जाते. या घटनेने गावामध्ये प्रचंह खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील नाळवंडी येथे बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे (वय 40) व त्यांच्या पत्नी काशीबाई बाबासाहेब म्हेत्रे हे शेतकरी कुटुंब राहते. आज सकाळी दोघांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. गावातील लोकांना या घटनेची माहिती समजल्यानंतर गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा काशीबाई म्हेत्रे यांचा मृतदेह जमीनीवर पडलेला दिसून आला तर बाबासाहेब म्हेत्रे यांचा मृतदेह घरामध्ये लटकताना दिसून आला. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी धाव घेतली. तेव्हा उपस्थित चित्र दिसून आलं. मयत बाबासाहेब म्हेत्रे याने प्रथम त्यांच्या पत्नी काशीबाई यांचा कशाने तरी गळा आवळून खून केला व नंतर स्वत:हून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक कयास पोलिसांकडून काढण्यात येत आहे. घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये रवाना केले. या शेतकरी म्हेत्रे कुटुंबाला चार अपत्य असून दोन मुलींचा विवाह झालेला आहे. घरी दोन मुले असल्याचे सांगण्यात येते. हे दोन्ही मुले घटनेच्या वेळी दुसर्या खोलीमध्ये झोपलेले होते. सदरची घटना ही रात्री उशीरा घडली असावी. त्या दोघात नेमका वाद काय झाला, अथवा ही दुर्दैवी घटना का घडली ? हे अद्याप समजू शकले नसले तरी पोलीस या घटनेची इत्यंभूत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.