बीड (रिपोर्टर) आएएस अधिकार्याच्या अंगावर जाण्याची मजल राजकीय नेत्यांचे अघोषीत पीए करू लागले आहेत. सीईओ अजित पवार यांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांना आणि त्यांच्या अंगरक्षकाला अरेरावी करणार्या धनराज मुंडे याच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन आज सकाळी सुरू केले. हे आंदोलन डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
जिल्ह्यातील सरकारी कर्मचार्यांना धमकावून हवे तसे राजकीय पुढारी कामे करून घेत आहेत. आता तर थेट आयएएस अधिकार्यांच्या अंगावर धावून जाण्याची मजल बीडचे पुढारी करू लागले आहेत. अशा स्वयंघोषीत पीएंवर कारवाई करावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सत्याग्रह आंदोलन सुरू केले. या वेळी शेख युनुस शेख मोबीन, शेख मुश्ताक, रामनाथ खोड, मनोज जाधव, बलभीम उबाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे देण्यात आली. सरकारी कर्मचार्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढले असून गत सोळा महिन्यांच्या कालावधीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणारे तब्बल 83 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.