बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात ज्या शाळेची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या शाळेवर कार्यरत असलेल्या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाची इतर शाळेत पर्यायी व्यवस्था म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. पर्याय व्यवस्था म्हणून ज्या शिक्षकाची इतर शाळेत नियुक्ती केलेली आहे, त्या शिक्षकाला पगारासाठी मात्र जुन्या शाळेवर जावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अनेक शाळांची पटसंख्या ही दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र इतर शाळेत पटसंख्या मोठी असतानाही त्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने गावकरी, शिक्षण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी इतरांना शिक्षकासाठी निवेदन देतात. अनेक वेळा शाळेला कुलूप ठोकण्यात येतात. या बाबी लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी आज ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व शिक्षकांना, केंद्रप्रमुखांना आणि गट शिक्षणाधिकार्यांना या प्रक्रियेसाठी बोलण्यात आले असून आजच्या प्रक्रियेतून दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या एका शिक्षकाला इतर ठिकाणी पदस्थापना देण्यात येणार आहे.