तहसीलदारांचे मंडल अधिकार्यांना नाराजीचे पत्र
बीड (रिपोर्टर) देवस्थानांच्या जमीनीसह वक्फ बोर्डाच्या जमीनीचा महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर वक्फ बोर्डाचा अचूक डाटाबेस तयार करण्याच्या सूचना आयुक्त कार्यालयाने दिल्या. मात्र बीड तालुक्यातील म्हाळसजवळा, चौसाळा, पिंपळनेर, राजूरीसह आदी मंडळ विभागातील तहसीलदारांनी हा डेटा तयार करण्यास टाळाटाळ केल्याचे उघडकीस आले असून उपायुक्तांनी तशी नाराजी तहसीलदारांकडे व्यक्त केल्यानंतर तहसीलदारांनी बीड तालुक्यातील मंडल अधिकार्यांना वक्फ बोर्डाच्या जमीनीबाबत तात्काळ माहिती देण्याचे आदेश काढले आहेत.
बीड जिल्ह्यात देवस्थानाच्या जमीनीसह वक्फ बोर्डाच्या जमीनीवर जमीन माफियांनी गंडांतर करत त्या सर्रासपणे विकल्या. हा घोटाळा चर्चेत आल्यानंतर औरंगाबाद विभागातील वक्फ बोर्डाच्या जमीनीचा अचूक डाटा जमा करण्याचे आदेश विभागीय उपायुक्तांनी दिले. मात्र बीड तालुक्यातील तहसीलदारांसह मंडल अधिकारी, तलाठी यांनी गेल्या महिनाभरात हा अचूक डाटा तयार करून विभागीय उपायुक्तांना देण्यास वेळोवेळी टाळाटाळ केल्याचे दस्तुरखुद्द तहसीलदारांच्या पत्रावरूनच उघड होत आहे. 10 जून रोजी तहसीलदारांनी मंडल अधिकार्यांना पत्र काढून त्यामध्ये स्पष्टपणे वक्फ बोर्डाच्या इनामी जमीनीबाबत मोठ्या प्रमाणात तफावती आहेत, सदरच्या तफावती दूर करण्यास वारंवार आपणास सूचीत करण्यात आले आहे मात्र त्या दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत, तो डाटा विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचला नसल्याने आयुक्तांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. असे सांगत डाटा तात्काळ जमा करण्याचे आदेश म्हाळसजवळा, चौसाळा, पिंपळनेर, राजूरी येथील मंडल अधिकार्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अद्यापही या मंडल अधिकार्यांसह तलाठ्यांनी संबंधित डाटा आयुक्तांना पुरवला नसल्याचे सांगण्यात येते. यातून जमीन माफियांचे महसूलशी लागेबांधे आहेत का? योग्य आणि बरोबर वक्फ बोर्डाच्या जमीनीचा डाटा देण्यास टाळाटाळ का केली जाते? यासह अन्य प्रश्न उपस्थित होत आहेत.