Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीडकोरोनाची दहशत, शाळा उघडल्या मात्र विद्यार्थी आलेच नाहीत

कोरोनाची दहशत, शाळा उघडल्या मात्र विद्यार्थी आलेच नाहीत

बीड शहरातील शाळांमधील बेंच रिकामे, शिक्षकांची शंभर टक्के हजेरी
अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या अद्याप नाही

बीड (रिपोर्टर)- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दहशतीत असलेल्या पालकांनी आज शाळा उघडल्यानंतरही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची हिंमत दाखविली नसल्याने बीड शहरातल्या सर्व शाळा रिकाम्या दिसून आल्या तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी काही शाळांमध्ये दिसून आले. शिक्षकांनी आदेशानुसार शाळेत हजेरी लावली मात्र काही शिक्षकांच्या अद्याप कोरोना चाचण्या झाल्या नाहीत. परळी २२, अंबाजोगाई ३४, केज २३ तर पाटोदा ४२ शाळांमध्ये २० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी दिसून आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे शाळांना भेटी देत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत मात्र पालकात भीतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अखेर आजपासून उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सोशल डिस्टन्ससह शासनाच्या अन्य नियमावलीप्रमाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शिक्षकांची कोरोना चाचणी आणि एका बेंचवर एक विद्यार्थी एवढी व्यवस्था करण्यात आल्यानंतरही राज्यसह देशातल्या अनेक भागात गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागल्यामुळे दुसरी लाट मोठी असण्याची शक्यता शासन-प्रशासन व्यवस्थेकडून व्यक्त होत आहे. माध्यमही याबाबत सांगत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातले जाणकारही दुसर्‍या लाटेच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करत आहेत त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचे की नाही या द्विधी मन:स्थितीत जिल्ह्यातील पालक आहेत. आज सकाळी आठ महिन्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांसह अन्य संस्थांच्या शाळांची घंटा वाजली खरी, शिक्षक मोठ्या प्रमाणावर शाळेमध्ये हजर झाले मात्र बीड शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी आलेच नाहीत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची हिम्मत पालकांनी दाखविली नाही. कोरोनासारख्या महामारीने सर्वत्र दहशत पसरवल्यामुळे आज शाळा सुरू होऊनही विद्यार्थी शाळेमध्ये आले नाहीत. ग्रामीण भागात मात्र काही शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले मात्र इथेही पालकांनी शिक्षकांसोबत चर्चा करत कोरोना बाबतची भीती व्यक्त केली. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जाणार्‍या शिक्षकांची कोरोना चाचणी बंधनकारक असली तरी बीड जिल्ह्यात अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या अद्याप झाल्या नसल्याचेही सांगण्यात येते.

विद्यार्थ्यांची अत्यल्प हजेरी
बीड शहरातील संस्कार विद्यालय, राजस्थान विद्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शहरातील इतर शाळांमध्ये शिक्षक सोडता विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. बीड जिल्ह्यात फक्त अंबाजोगाईमध्ये ३२, केजमध्ये २३, पाटोदा ४२ आणि केज ४२ इतक्याच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.

Most Popular

error: Content is protected !!