बीड (रिपोर्टर) मोबाईलवर आलेल्या एसएमएसमध्ये तुमचे मागील महिन्याचे लाईट बील भरलेले नाही त्यामुळे आज रात्री 9.30 वाजता तुमची लाईट कट होणार आहे. जर लाईट सुरू ठेवायची असेल तर आमच्या अधिकार्याशी बोलू शकता. असा एसएमएस वाचून एका महावितरणच्या ग्राहकाने आलेल्या एसएमएसमधील नंबरवर फोन केल्यानंतर समोरून त्याला महावितरणचा अधिकारी बोलतोय असे म्हणत एक अॅप्लीकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले आणि तीन वेळा प्रत्येकी 50 हजार असे दिड लाख रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बीड शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
धनंजय भास्कर डोंगरे (वय 51 रा.धोंडीपुरा टिळक रोड बीड) यांना दि.18 जून रोजी दुपारी 12 वा. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून एसएमएस आला. त्यामध्ये लिहिले होते की, तुमच्या मागच्या महिन्याचे लाईट बील भरलेले नाही व आज रात्री 9.30 वाजता तुमची लाईट कट होईल, तुम्ही एसएमएसमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या अधिकार्याशी बोलू शकता असा एसएमएस आल्यामुळे त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क केला. समोरून आम्ही महावितरण अधिकारी बोलतोय असे सांगितले. तुम्ही टिमव्युअर अॅप्लीकेशन डाऊनलोड करून सदर अॅप्लीकेशनवरून डोंगरे यांचा पासवर्ड यूज करून बँकमधून तीनवेळा प्रत्येकी 50 हजार रूपये प्रमाणे एकूण दिड लाख रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवूणक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ धनंजय भास्कर डोंगरे यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात बीड शहर पोलिसात 420 भादवि कलम 66(क), 66(ड) भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.