सभेतून नाही तर आम्ही आमच्या कामातून कर्तृत्वातून उत्तर देऊ, 2024 ला निकालातून त्या सभेला उत्तर मिळेल]
बीड (रिपोर्टर): ‘स्वाभिमान’ला उत्तर देण्यासाठी आमची सभा नाही. आम्ही आमच्या कामातून, कर्तृत्वातून उत्तर देऊ, सभेतून नाही, असे म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी त्या सभेला जनताच 2024 च्या निकालातून उत्तर देईल, असे म्हटले. बीड जिल्ह्याचा विकास, सन्मान आणि अस्मिता व दुष्काळ मिटवण्यासाठी उद्याची सभा असणार असल्याचे त्यांनी सांगून दादांची दृष्टी विकासाची आहे, त्यासाठीच आम्ही दादांच्या पाठीशी असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले.
ते 27 तारखेला होत असलेल्या बीडमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभानियोजन बाबतच्या राष्ट्रवादी पदाधिकार्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.या वेळी बैठकीला आ.प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, आ.बाळासाहेब आजबे, विजयसिंह पंडित, कल्याण आखाडे, राजेश्वर चव्हाण, प्रजाताई खोसरे, अशोक डक, पापा मोदी, दत्ता पाटील, जयसिंह सोळंके, शिवाजी राऊत, माधवराव निर्मळ, बबन गवते, रामकृष्ण बांगर, दशरथ वनवे, बाळा बांगर, विलास सोनवणे, नारायण शिंदे, अविनाश नाईकवाडे,
महादेव धांडे, सतीश शिंदे, विष्णूपंत सोळंके, संगीताताई तुपसागर यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून या बैठकीला सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित आहेत. पुढे बोलताना सभा रद्द करण्याची बातमी प्रश्नार्थक चिन्ह देऊन दाखवण्यात आली, संदिग्धता निर्माण झाली. बीड जिल्ह्यावर आणि आमच्यावर सर्वांचेच लक्ष आहे. असो, परंतु जिल्ह्याचे मागासपण दूर करणे ही आमची बांधिलकी असल्याचे सांगून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आम्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकायची आहे, त्यासाठी आम्ही सत्तेसोबत असल्याचे त्यांनी म्हटले. कायम संघर्ष करून जिल्ह्याने अनेकांना मोठे केले पण जिल्ह्याचा मागासलेपणा कोणीही दूर करू शकले नाही, पुरोगामी विचार आणि वसा कधीच सोडला नाही आणि सोडणारही नाही. का व कशासाठी सत्तांतर झाले हे दादांनी मुंबईत सांगितले. जी 17 तारखेला सभा झाली ती नेमकी कशासाठी होती हे समजले नाही. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे, सर्वांनी ताकतीने लोकांना घेऊन यायचे आहे, सर्वाधिक लोक हे बीड विधानसभा मतदारसंघातून येतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. सभेची जय्यत तयारी होत असून दादा काय बोलणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.