उद्याच्या सभेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क
पार्किंग व्यवस्थेचे नियोजन
बीड (रिपोर्टर): उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्रिमंडळातील फौजेसह उद्या बीडमध्ये डेरेदाखल होत असल्याने बीड पोलीस सतर्क झाली असून सभेसाठी पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, तीन उपअधिक्षक, दहा पीआय, 43 पीएसआय, 200 पोलीस, 50 महिला पोलीस, दंगल नियंत्रण पथके 4, एलसीबीसह अन्य यंत्रणा खडा पहारा देणार आहे. त्याचबरोबर पोलीस यंत्रणेने वाहतुकीतही बदल केले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याने बाहेरून येणार्या लोकांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यासाठी करण्यात आली आहे. शहरातील नागरीकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे न येता जय भगवान चौक, शिवराज पानसेंटर येथून नगरनाका, कॅनाल रोह, अंबिका चौक, रिलायन्स पेट्रोल पंप या मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच बशीरगंज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पुर्णपणे बंद राहणार आहे. सदरील रोडने येणार्या नागरीकांनी भाजी मंडई मार्गाचा वापर करावा, बीड शहरातील व शहरात येणार्या नागरीकांनी शिवाजी महाराज चौकाकडे न येता इतर मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे. नगर रोडकडून येणारी वाहने चंपावती विद्यालय, बीह, शासकीय आयटीआय ग्राऊंड येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर परळी व बार्शी रोडने येणारी वाहने बार्शी नाका चौक येथून बिंदुसरा नदी पात्रामध्ये उभी केली जाणार आहेत. जालना रोडवरून येणार्या वाहनांसाठी स्व. विनायकराव मेटे यांचे समाधीस्थळ, कॅनाल रोह, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे तर बीड शहरातील कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.