Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडओल्या दुष्काळाने घेतला शेतकर्‍याचा बळी शहाजानपुरात अशोक मतेची गळफास घेऊन आत्महत्या

ओल्या दुष्काळाने घेतला शेतकर्‍याचा बळी शहाजानपुरात अशोक मतेची गळफास घेऊन आत्महत्या


बीड (रिपोर्टर)- दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्‍याला यावर्षी मुसळधार पावसामुळे ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी अक्षरश: उद्विग्न झाल्याचे दिसून येत असून बीड तालुक्यातील नाथापूर जवळ असलेल्या शहाजानपूरमध्ये पावसामुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि भरून न येणारे नुकसान पाहता कर्जबाजारी असलेल्या तरुण शेतकर्‍याने शेतातच रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बीड तालुक्यातील शहाजानपूर येथील अशोक बाबासाहेब मते (वय 40) या तरुण शेतकर्‍याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री उशीरा हे प्रकरण उघडकीस आले. अशोकने साडे सहा वाजण्याच्या सुमारास घरी जेवण केले आणि तो थेट शेतात गेला. यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतातलं उभं पीक पाण्याखाली गेलं. उत्पन्नाचे साधन नाही. आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून? यासह अन्य आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री तो उशीरापर्यंत घरी आला नाही. तो शेताकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर घरातले लोक शेताकडे गेले असता अशोकचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला. शेतकर्‍याच्या या आत्महत्येच्या घटनेने पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अशोकचा मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात आज शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या पार्थीवदेहावर आज सकाळी शहाजानपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!