अखेर शिंदे-अजितदादा सराटे अंतरवलीत येणार
आज सायंकाळी जरांगे उपोषण सोडण्याची शक्यता
अनेक मंत्र्यांची उपस्थिती मात्र देवेंद्र फडणवीस गैरहजर?
12 ऑक्टोबरची डेडलाइन, 5 अटी
न्या.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही येवो, मराठ्यांना 31 व्या दिवशी (12 ऑक्टोबर) महाराष्ट्रभरात कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत.
आंदोलकांसह ग्रामस्थांवर लाठीचार्ज करणार्या सर्व दोषी पोलिस अधिकार्यांना निलंबित करावे.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन लेखी आश्वासन द्यावे.
सरकारने मराठा समाजाच्या या सर्व अटी मान्य असल्याचे बाँडपेपरवर टाइप करून लेखी आश्वासन द्यावे.
बीड (रिपोर्टर): सरकारला एक महिन्याचा वेळ देत सशर्थ अटीवर उपोषण मागे घेताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सराटे अंतरवलीत यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी अखेर मान्य करत आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सराटे अंतरवलीत जावून 15 दिवसांपासून उपोषण करणारे जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील आज उपोषण मागे घेण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र सराटे अंतरवलीत येणार नसल्याचे सांगण्यात येते. उपोषणकर्त्यांवर झालेला लाठीमार आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दगडफेकीाबबत केलेले वक्तव्य यामुळे समाजात फडणवीसांविरुद्ध तीव्र असंतोष असल्यानेच ते सराटे अंतरवलीत येत नसल्याचे बोलले जाते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, सरसकट कुणबी प्रमाणपि देण्यात यावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यावर सरकारने वेळ मागितला असता सशर्थ अटीवर काल जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सराटे अंतरवलीत यावे आणि समाजाला संबोधावे, असे जरांगे यांनी म्हटले होते. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रिमंडळ सराटे अंतरवलीत डेरेदाखल होत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगेप ाटील आज सोडतील. मात्र या एक महिन्याच्या कालावधीत ते घरी जाणार नसून सराटे अंतरवलीमध्येच थांबणार आहेत. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सराटे अंतरवलीत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुख्यमंत्र्यांचे स्वागत- मनोज जरांगे
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागील 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. जालना येथील आंतरवली सटारी येथे सुरू असलेल्या त्यांच्या उपोषणाचा आज तब्बल 16वा दिवस आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा आश्वासनाबाबत लेखी आश्वासन दिले तरच उपोषण मागे घेईल, अशी
भूमिका मनोज जरांगे यांनी मंगळवारी स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व मंत्रिमंडळासह आंतरवली सराटी येथे जाणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आंतरवली सराटी येथे जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री आंतरवली सराटी येथे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.