गेवराई (रिपोर्टर) मराठा आरक्षणाचा लढा योग्य टप्प्यावर आलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. मात्र तरुणांनी आत्महत्या केल्या तर या आरक्षणाचा उपयोग काय, त्यामुळे हा लढा शांततेत पार पाडा, आपण सरकारने मागितलेल्या वेळेपेक्षाही दहा दिवस त्यांना जास्त दिले आहेत. 14 तारखेला सराटी आंतरवली येथे भव्य सभा होणार आहे. गर्दी हीच सरकारला धडकी भरवणारी असणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील प्रत्येक तरुणाने 14 तारखेला सराटी अंतरवलीला यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आज सकाळी त्यांनी गेवराई मार्गे गढी, रांजणी, पाडळसिंगी, कृष्णानगर, मादळमोही या गावांना भेटी दिल्या. या वेळी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मराठा आरक्षणासाठी 17 दिवस उपोषर केल्यानंतर जरांगे पाटील गावागावाला भेटी देत आहेत. सरकारने मागितलेल्या मुदतीतच आपल्याला आरक्षण मिळेल, तरुणांनो धीर सोडू नका, आपण जर आत्महत्या केल्या तर आरक्षण मिळून काय उपयोग होणार? त्यामुळे येणार्या काळात आपल्याला ही लढाई शांततेच्या मार्गाने लढाईची आहे. 14 तारखेला सराटी अंतरवलीत मराठा समाजाची भव्य सभा होणार आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, गर्दी हीच सरकारला धडकी भरवणारी असेल, असे आवाहनही त्यांनी केले. सकाळी 11 वाजता गेवराई तालुक्यातील गढी येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रांजणी येथे भर पावसात फुलं उधळून, महिलांनी औक्षण करत त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. पाडळसिंगी, कृष्णानगर, मादळमोहीत दुपारपर्यंत त्यांचे ठिकठिकाणी स्वागत झाले. दुपारनंतर ते कोळगाव, काजळा, धारवंटा, साक्षाळपिंप्री, नारायणगड, फुलसांगवी त्यानंतर तांदळा येतील साखळी उपोषणाला ते भेट देणार आहेत. पुढे शेकटा, चकलांबा, पौळाची वाडी, बागपिंपळगाव, खळेगाव, उमापूर, माटेगाव, देवपिंप्री, कोमलवाडा फाटा, राजपिंप्री आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता पांढरवाडी या गावात आजच्या दौर्याचा शेवट होणार.