Monday, January 24, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- तुका म्हणे, येथे पाहिजे जातीचे....

अग्रलेख- तुका म्हणे, येथे पाहिजे जातीचे….


गणेश सावंत
मो. नं. 9422742810
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासून महाराष्ट्राचे राजकीय दावपेच गणिमी काव्याच्या रुपाने जगभरात प्रसिद्ध आहेत. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे आणि भाजपाच्या सत्ताकारणाला हादरा देणारी घटना 2019 साली तीन पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापनेने दिली. 2014 पासून देश काबिज करण्यास निघालेल्या भाजपाला महाराष्ट्राने आणि तिथल्या राजकीय विचारसरणीने वेसन घातले. सत्ता ही आपली सखी आहे अन् तिच्या कुशित निजणे हाच आपला हक्क आहे, हा आविर्भाव असलेल्या आजकालच्या हिटलरवादी नेतृत्वाला हे खटकलं. दिल्लंच तक्त नेहमीच महाराष्ट्राने हादरवून सोडलं. जे सोळाव्या शतकात घडत होतं तेच एकेविसाव्या शतकात घडत राहिलं. गनिमी काव्याच्या उद्देशातून तडजोड, तह अन् दिल्ली तक्ताला जोखडून ठेवण्याइरादे राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडी सरकार हे जणू भाजपाच्या डोळ्यात सलत राहिलं. हा फापट पसारा सांगण्याचा उद्देश एवढाच, महाराष्ष्ट्राचा राजकीय विचार हा तहाने, समजुतीने, सामंजस्याने आणि संगनमताने आत्मसात केला जाऊ शकतो. परंतु याच विचाराला कोणी ताकत लावत असेल, कोणी धमकावत असेल, नख लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला महाराष्ट्राचा राजकीय विचार हा सत्ताकारणापासून दूर ठेवण्यात यशस्वी होतो. त्याचा प्रत्यय या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये उभ्या देशाला पहावयास मिळाला. भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जे महाराष्ट्रातले कलगीतुर्‍याचे दोन प्रमुख विरोधक आजही महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी झटण्यापेक्षा सत्ताकारणासाठी झगडताना दिसतात. साम-दाम-दंडातून महाराष्ट्रातलं सरकार पडत नाही हे जेव्हा दिल्ली तक्ताच्या मोदी सरकारला लक्षात येतं तेव्हा


महाराष्ट्राला अस्थिर
करण्याहेतू देशाचं संविधान आणि लोकशाहीचं पार वस्त्रहरण केलं जातं. 2019 पासून राज्यातल्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार पडणार, पाडणार, यापेक्षा अधिक वक्तव्य अन्य कुठल्या विषयावर केलेच नाही. जे राज्यातले भाजप नेतृत्व करत आले तेच केंद्रातल्या नेतृत्वाने महाराष्ट्रातले प्रमुख विषय असल्याचे समजून घेतले. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रावरचे नैसर्गिक संकटे आले. कधी दुष्काळ, कधी पुरपरिस्थिती, कोरोना महामारीसारखी भयंकर लाट. या संकटात महाराष्ट्राचा माणूस जगला की मेला हे पाहण्यासाठी भारतीय जनता पार्टीला उसंतही मिळाली नाही. परंतु राज्यातलं ठाकरे सरकार पडणार यावर भाष्य करण्यासाठी या लोकांना वेळच वेळ मिळाला. जेव्हा सरकार पडत नाही हे लक्षात आलं तेव्हा भारतीय जनता पार्टीने इतर राज्याबरोबर महाराष्ट्रातही बेकायदा अधिकार वापरण्यास सुरुवात केली. कधी इन्कम टॅक्सच्या नावाने, कधी ईडीच्या नावाने महाराष्ट्रात दोन वर्षांच्या कालखंडात धुमाकूळ घालण्यात आला, इथही आपलं दाळ शिजत नाही हे लक्षा तआल्यानंतर महाराष्ट्राला नशेबाज दाखवण्याइरादे गेल्या दोन महिन्याच्या कालखंडात जो


नशेचा
राजकीय बाजा

एनसीबीच्या माध्यमातून राज्यात भरवला जातोय त्या बाजारात सत्यापेक्षा सत्तेला अधिक महत्व दिलं जातय. राजकारण करताना समाजकारणाला किती महत्व द्यायचं याचा विचार आधी केला जायचा मात्र आता भाजपाच्या काफिल्यात राजकारण करत असताना समाजकारणापेक्षा वैचारिक ध्रुवीकरण आणि चारित्र्य हननाला अधिकाधिक महत्व द्यायचं हे जे नवं धोरण आखण्यात आले आहे त्या धोरणानुसार महाराष्ट्राचे चारित्र्यहनन भारतीय जनता पार्टीकडून केवळ सत्ताकारणासाठी सातत्याने होत होत आहे. ज्या महाराष्ट्रात छत्रपतींची शिवशाही, रामराज्यापेक्षा सर्वश्रेष्ठ मानली जाते, जिथे बलात्कार्‍याचे हातपाय तोडले जात होते, गुन्हेगाराचा कडेलोट केला जात होता, शेतकर्‍याच्या भाजीच्या देठाला हात लावण्याची हिम्मत होत नव्हती त्या महाराष्ट्रात केवळ सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पार्टी केंद्रातील सत्तेच्या जोरावर एनसीबीच्या माद्यमातून सर्रासपणे बनावट छापासत्र सुरू करते. हा छापासत्र पैसे कमवण्याहेतू अन् महाराष्ट्राच्या नावाजलेल्या लोकांना बदनाम करण्याहेतू सुरू असल्याचेही आता जेव्हा स्पष्ट होत आलं आहे तेव्हा पुन्हा एकदा जातीवर बोट ठेवण्याचं काम


आर्यन विरुद्ध वानखेडे
या विषयातून सुरू झालं. आर्यन हा सिनेअभिनेता शाहरुख खानचा मुलगा, त्याच्याने नशिली पदार्थाचे सेवन केले की नाही, त्याच्याकडे नशिले पदार्थ होते की नाही यावर भाष्य करण्यापेक्षा ज्या क्रुजवर एनसीबीने छापा मारला तो छापा प्रीप्लॅन होता. मग आर्यन विरुद्ध वानखेडे हा जो तमाशाचा वघ महाराष्ट्राच्या फडात रंगतोय या रंगलेल्या फडाला जातीचा रंग कोण देतोय? हे आजच्या तरुण पिढीने लक्षात घेतले पाहिजे. आर्यनला पकडल्यानंतर भाजपाच्या ताब्यात असलेल्या एनसीबी केंद्रीय यंत्रणेची लक्तरे ज्या पद्धतीने वेशिला टांगली जाताना दिसून येऊ लागले आहेत त्या एनसीबीच्या अर्धनग्न पणामुळे वानखेडेकडील तपास काढून घ्यावा लागला, आणखी एनसीबीचे नागवेपण महाराष्ट्रासमोर नव्हे देशासमोर नव्हे जेव्हा जगासमोर येईल तेव्हा केवळ महाराष्ट्र काबीज करण्याइरादे, भाजपाने केलेले हे कुकार्य खरच अयोग्य होते हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तरुणांना उमजून येईल, परंतु हे उमजून येण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी जो काही काळ आणि वेळ गेलेला असेल तो नक्कीच परत येणार नाही. गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालखंडात महाराष्ट्रात जे केेंद्रीय यंत्रणेकडून हल्लाकल्लोळ माजवला जातोय आणि या हल्लाकल्लोळातील छाप्यात अद्याप एकही निष्पन्न अशी गोष्ट झाल्याचे दिसून आले नाही. त्यातूनच केवळ महाराष्ट्राला अस्थिर करणं आणि नशेबाज दाखवणं हे जर भाजपाचे खुणसी धोरण आणि

मानस असेल तर
हा महाराष्ट्र आहे

हे दिल्ली तक्ताच्या भाजपाने विसरू नये. महाराष्ट्राच्या मातीत शिवबांचं राजकारण, त्यांचे राजकीय गुरू जगद्गुरू संत तुकोबांचे ध्येय-धोरण असल्याने इथला राजकारणीच काय सर्वसामान्यही अशा केंद्रीय यंत्रणेच्या धोकेबाज छापेतंत्राला भिणार नाही आणि भाजपाच्या अशा दंतक धक्कातंत्राला घाबरणार नाही. तुकोबा म्हणतात,
नको दंत कथा सांगू इथे कोणी…
कोरडे ते बोल माने कोण….
अनुभव येते व्हावा शिष्टाचार…
न चलती चार आम्हा पुढे…
निवडी वेगळे क्षीर आणि पाणी…
राजहंस दोन्ही वेगळाली…
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे…
येर्‍या-घबाळ्याचे काम नाही….
महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला दुधामधलं पाणी वेगळं काढता येतं. इथं दंतकथा सांगून, केवळ कोरडे बोल बोलून अथवा पोटावर गाठोडं बांधून कोणी गरोदर असल्याचं दाखवत असेल तर ते तात्काळ कळतं. महाराष्ट्राला कुठल्याही कामात कामात तरबेज असणारा, सत्य स्वीकारणारा, समाजकारण करून राजकारण करणारा सत्ताकारणी हवा असतो. म्हणजे येथे पाहिजे जातीचे येर्‍या-घबाड्याचे काम नाही’ हे तुकोबांनी केव्हाच सांगितले आहे. खरं तर आर्यनसारखा कोणीही असो, तो नशेबाज, गंजिटा असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, परंतु तो निष्पाप असेल तर आर्यनच काय आर्यनसारख्या कुठल्याही तरुणाचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे काम कोणी करू नये. 

Most Popular

error: Content is protected !!