Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपरळीतलवारीचा धाक दाखवून सिरसाळ्यात दरोडा नगदी 92 हजारांसह सोन्या, चांदीचे दागिने लुटले

तलवारीचा धाक दाखवून सिरसाळ्यात दरोडा नगदी 92 हजारांसह सोन्या, चांदीचे दागिने लुटले


सिरसाळा (रिपोर्टर):- सिरसाळा येथील हायस्कुल परिसरातील एका घरात रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. घरातील महिलांना तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेत नगदी 92 हजार रूपये लुटल्याची घटना घडली. या घटनेने सिरसाळा येथे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती सकाळी पोलीस प्रशासनाला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ दाखल झाले होते. दरोडोखोर चौघे जण होते. हे दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत असल्याचे सांगण्यात आले.


संपत पुरी व त्यांचे कुटुंब झोपेत असतांना अज्ञात दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत त्यांची पत्नी व मुलीला तलवारीचा धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्याचबरोबर संपत पुरी यांना मारहाण करून त्यांच्याकडील 92 हजार रूपये लुटले. कपाटातील इतर साहित्य दरोडेखोरांनी चोरून नेले. हे दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत असल्याचे पुरी कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले. घटनेची माहिती सिरसाळा पोलीसांना झाल्यानंतर पीएसआय जोंधळे, एकशिंगे, पीएसआय शेळके, मिसाळ, संजय वडमारे, नसिर शेख, सखाराम पवार, अशोक दुबाले, यांच्यासह आदींनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी श्‍वान पथक, फिंगरप्रिंट तज्ञ, स्थानिक गुन्हे शाखेला पाचारन करण्यात आले होते. या घटनेने सिरसाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


हातोल्यात घरफोडी, अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

अंमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातोला येथील जिजाबा बाबू पुत्तरवाडे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने काल रात्री प्रवेश करत बनावट चावीने कुलूप उघडून घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व पेटीत ठेवलेली रोख रक्कम लंपास केली. यामध्ये नगदी 1 लाख 10 हजार रूपये तर 10 ग्रॅमचे मनीमंगळ सुत्र, तीन ग्रॅमचे सोन्याचे बाजीगर, सहा ग्रॅमची सोन्याची नत, 8 ग्रॅमची सोन्याची पानपोत, 3 ग्रॅमचे सोन्याचे ताईत, 5 ग्रॅमच झुंबर, 7 ग्रॅमची बोरमाळ, 5 ग्रॅमचे झुंबर असा एकूण 2 लाख 51 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.

Most Popular

error: Content is protected !!