तीन जण पोलिसांच्या ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप
मुंबई (रिपोर्टर)- राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे.
गुणरत्न सदावर्ते हे परळ येथील क्रिस्टल टॉवर येथे राहतात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास क्रिस्टल टॉवरच्या पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यकर्ते हातात काठी घेऊन आले आणि त्यांनी बेधडकपणे गणरत्न सदावर्तें च्या गाडीच्या काचा फोडल्या.
विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांनी पार्किंगमधील इतर वाहनांना हात लावला नाही. फक्त गुणरत्न सदावर्ते यांच्याच गाडीची तोडफोड केली. यावेळी, एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, मला वारंवार धमक्या येत आहेत, असा दावाही गुणरत्न सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. यामुळे तेव्हापासूनच गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक भागांत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. तसेच, आरक्षणासाठी आम्ही शांततेचं आंदोलन करत आहोत. कुणीही उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ, तोडफोड करू नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहेत.