विमा कंपन्या वेळकाढूपणा करतायत; अपिल फेटाळणार, शेतकर्यांना मदत करणार -धनंजय मुंडे
नागपूर (रिपोर्टर): राज्यातल्या 52 लाखांपेक्षा जास्त शेतकर्यांना पीक विम्याचे अग्रीम 2 हजार 216 कोटी रुपये मंजूर झाले. आतापर्यंत 1600 कोटी रुपयांचे वाटप झाले असून 600 कोटी रुपये शेतकर्यांना वाटप केले जात आहेत. हे नुसते अग्रीम आहे. अंतिम नुकसान भरपाई आणखी शेतकर्यांना मिळणार असल्याचे सांगून ज्या जिल्ह्यात पीक विमा कंपन्या आक्षेप घेत आहेत ते आक्षेप उठवून त्या त्या जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक विम्याचे अग्रीम दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेमध्ये केली.
विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आज राज्यातील पीक विमा अग्रीमाबाबत विषय चर्चेत आला. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पीक विम्याचे अग्रीम दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. या वेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा अग्रीमबाबतची आकडेवाडी पटलावर मांडली. 26 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा अग्रीम मंजूर झाला असल्याचे सांगून 14 जिल्ह्यात कुठलेही आक्षेप नाहीत, त्याठिकाणी अग्रीमची रक्कम शेतकर्यांना मिळाली आहे. मात्र 9 जिल्ह्यातील काही भागात विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेले आहे तर एका जिल्ह्यात पुर्ण आक्षेप आहेत. 9 जिल्ह्यातले आक्षेप जिल्हाधिकार्यांपासून आयुक्तापर्यंत फेटाळण्यात आले आहेत. विमा कंपन्यांच्या हे लक्षात आले आहे की हे सरकार शेतकर्यांच्या पाठिशी आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना नुकसान भरपाई देऊ पाहत आहे. आतापर्यंत राज्यातल्या 52 लाख शेतकर्यांना 2 हजार 216 कोटी अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 1 हजार 600 कोटी रुपयांचे वाटप झाले असून 600 कोटी रुपये वाटप सुरू असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले. विमा कंपन्या अपिलात जावून वेळकाढूपणा करत असल्या तरी सरकार त्यांचे अपील फेटाळून शेतकर्यांना नुकसान भरपाई देणारच आणि हे अग्रीम आहे, अंतिम नुकसान भरपाई फेब्रुवारीपर्यंत शेतकर्यांना दिले जाणार असल्याचेही धनंजय मुंडेंनी म्हटले.