बीड (रिपोर्टर)ः-खरीप व रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानूसार कप अॅन्ड कॅप मॉडेलनूसार बीड पॅटर्न लागू करण्याची महत्वाची घोषणा राज्य सरकारने काल केली.
या योजनेनूसार अधिसुचीतील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान पिक विमा योजनेचा फायदा शेतकर्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच होत असल्याने यात बदल करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती. अखेर राज्य सरकारने बीड पॅटर्ननूसार कप अॅन्ड कॅप ही योजना लागू केली आहे. यानूसार नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग सारख्या संकटामुळे शेतीच्या होणार्या नुकसानापोटी शेतकर्यांना भरपाई देण्यात येणार आहे. 80-110 सुत्रानूसारच्या बीड पॅटर्न पिक विमा योजनेस केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सरकारने ही योजना राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कंपन्यांच्या नुकसान भरपाई पोटी 110 टक्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागली तर त्याचा भार राज्य केंद्र सरकार उचलणार असून या उलट विम्या पोटी कंपनीला 80 टक्क्यापेक्षा कमी रक्कम दयावी लागल्यास शेतकर्यांना दिलेली मदत अधिक 20 टक्के नफा ठेवून कंपनीला उर्वरीत रक्कम राज्य सरकारला दयावी लागणार आहे. या योजनेनूसार पिक विमा काढतांना शेतकर्यांना रब्बीसाठी 1.5 टक्के, खरीप पिकांसाठी 2 टक्के, तर खरीप आणि रब्बी हंगामातील कापूस, कांदा आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के भार उचलावा लागणार आहे. विमा हप्त्याची उर्वरीत रक्कम राज्य आणि केंद्र सरकार समान प्रमाणात भरणार आहे. नगर, नाशिक,चंद्रपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी एचडीएफसी अॅग्रो इन्सुरन्सची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर, जळगांव, सातारा, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, वाशीम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. आयसीआयसीआय लोबार्ड जनरल इन्सुरन्स कंपनीकडे परभणी, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी युनायटेड इंडिया आणि बीडसाठी बजाज अलायन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे.