लिंबागणेश (रिपोर्टर): बीड तालुक्यातील पिंपरनई येथे काल दि.13 सोमवार रोजी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान सुरू असतानाच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यमुना अनिल आमटे वय 33 वर्षे या विवाहितेचा घरात विद्युत प्रवाह उतरल्याने विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे.
एकीकडे गावात लोकशाहीचा उत्सव साजरा करत असतानाच घडलेल्या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली असुन घटनेनंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.गरीब ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यमुना आमटे यांना पृथ्वीराज व प्राची नावाची 12 वर्षे वयाची जुळी मुले आहेत.आनिल ऊसतोडणीसाठी बाहेर गावी गेल्यानंतर ही घटना घडली.यमुनाबाई यांच्या आई शकुंतला लक्ष्मण वायभट या शेतातुन दुपारी घरी आल्यानंतर त्यांना यमुनाबाई बेशुद्ध पडलेल्या दिसल्या.हात लाऊन उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना करंट बसल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमा झाले.वायर तोंडुन त्यांना बीड येथील रूग्णालयात नेण्यात आले परंतु त्यापुर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.