नऊ विभागातील वर्ग तीनच्या कर्मचार्यांच्या होणार प्रशासकीय बदल्या

बीड, (रिपोर्टर)ः- गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर विकास सेवे अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. मात्र यावर्षी शासनाने या बदल्या करण्यासाठी परवानगी दिली आहे. आज बीड जिल्हा परिषदेमधील नऊ विभागातील कर्मचार्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
गेल्या पाच वर्षापासून या बदल्या समुपदेशाने होत असल्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये लाखो रूपयांचा होणारा घोडेबाजार थांबण्यात आला आहे. आज होणार्या बदल्यामध्ये एकाच ठिकाणी तीन किंवा तीनेपेक्षा अधिक वर्षे काम केलेल्या कर्मचार्यांच्या बदल्या ह्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात येणार आहे तर काही कर्मचार्यांची व्यक्तीक अडचण लक्षात घेता त्यांनी विनंती बदलीचा अर्ज दिला तर अशा बदल्या सुध्दा आज होणार आहेत. आज होणार्या बदल्यामध्ये महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी, बालवाडी सुपरवायझर, आरोग्य विभागाच्या नर्स, ग्राम विकास विभागातील विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बांधकाम विभागातील मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक, सामान्य प्रशासन विभागातील विस्तार अधिकारी, वरिष्ठ लिपिक अशा नऊ विभागातील या बदल्यांची प्रक्रिया बीड जिल्हा परिषदेमध्ये सुरू झाली आहे. या बदल्या समुपदेशाने होणार असल्यामुळे सर्व खातेप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप काकडे, सीईओ आदित्य जिवने यांच्या उपस्थितीमध्ये या बदल्या होणार आहेत.





