बीड (रिपोर्टर): राज्यात गेल्या दीड महिन्यापासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर काल थंडावल्या. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 35 मतदारसंघात यापुर्वीच चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. आता 20 मे रोजी मुंबईसह अन्य 13 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडून महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून 48 जागांमध्ये दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, एक काँग्रेस आणि भाजपातल्या मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे, ते निकाला दिवशी 4 जूनलाच बाहेर येईल आणि कोण राजा, कोण रंक हे उभ्या महाराष्ट्राला समजेल.
2024 ची लोकसभा निवडणूक ही जेवढी बहुचर्चीत तेवढीच बहुरंगी आणि बहुढंगी पहायला मिळाली. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. अजित पवारांची राष्ट्रवादी फोडली त्यामुळे महाराष्ट्रात चार पक्षांचे सहा पक्ष झाले अन् इच्छुक उमेदवारांची बहुगर्दी झाली. गेल्या चार टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 35 जागांसाठी मतदान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात मतदारांनी मतदान केले, आता उद्या 13 जागांसाठी मुंबईसह अन्य भागात मतदान होत आहे. या वेळेस भाजप महायुतीत एकनाथ शिंदेंची शिवसेना अन् अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी आहे तर महाआघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आपलं भवितव्य अजमावू पहात आहे. उद्या 13 जागांसाठी मतदान झाल्यानंतर राज्यातल्या सर्व जागांचे मतदान संपणार आहे. या 48 जागांसाठी अनेक मातब्बरांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. या सर्वांचे भविष्य आणि भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.