अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दबावाला झुगारून पुढे येण्याचे आवाहन
गेवराई (रिपोर्टर) शेतकऱ्यांना नव संजीवनी देणारा आजवरचा सर्वात चांगला प्रकल्प म्हणून गणल्या जाणाऱ्या पोकरा प्रकल्पाला कृषीच्या निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांची दृष्ट लागली आहे. करोडोंची माया कमावण्यासाठी चक्क शेतकऱ्यांची अडवणूक होऊ लागली आहे. चिरीमिरी साठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या या कृषितील भ्रष्ट लोकांची माहिती पुराव्यासह आता पोकराच्या प्रकल्प संचालकांकडे दिली जाणार आहे. अडल्या नडल्या शेतकऱ्यांचा आवाज बनून रिपोर्टर उभा असून पिचलेल्या शेतकऱ्यांनी कुणाच्याही दबावाला न जुमानता आपल्याकडील पुरावे व तक्रारी आमच्याकडे द्याव्यात असे आवाहन केले आहे. जागतिक बँकेच्या अर्थ साहाय्याने महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून एक पथदर्शी प्रकल्प राबवला आहे. मात्र या योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देतांना आपलं उखळ पांढरं करून घेण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. शेतकऱ्यांना जणू आपल्या पगारातून अनुदान देत असल्याच्या अविर्भावात कृषीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वागणे आहे. एकतर कर्ज घेऊन आधी काम पूर्ण करायचे आणि नंतर अनुदानाच्या प्रतीक्षेत बसायचे, झटपट अनुदान मिळत असतांना केवळ आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरायची भूमिका कृषी विभागातील काही भ्रष्ट लोकांनी घेतलेली आहे.
सर्व पुरावे, संचालकाकडे देणार ; शेतकऱ्यांनी पुढे यावे
ड्रीप, शेडनेट, फळबाग लागवड, शेततळे, अस्तरीकरण, रेशीम उद्योग आदी बाबींचा लाभ घेतांना कृषी विभागातील या लुटारूंच्या टोळीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या भ्रष्ट व्यवस्थेमुळे जळगावच्या शेतकऱ्याला जीव गमवावा लागल्यानंतर रिपोर्टरने याप्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर अक्षरशः शेकडो शेतकऱ्यांनी आमच्याकडून कसे पैसे घेतले, पैशासाठी कशी अडवणूक झाली यासह गावागावात कर्मचाऱ्यांचे दलाल असून ते कशी पिळवणूक करतात याचा पाढा वाचला असून अनेकांनी पुरावेच दिले आहेत. मात्र जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व यंत्रणा या भ्रष्ट लोकांच्या पाठीशी असल्याने त्यांना याचे गांभीर्य नाही. यामुळे आता थेट पोकराचे प्रकल्प संचालक विजय कोळकर यांच्याकडे हे पुरावे देऊन या भ्रष्ट लोकांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार रिपोर्टर ने केला आहे. त्यामुळे अजूनही लूट झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील पुरावे व तक्रारी आमच्याकडे द्यावेत, या भ्रष्ट लॉबीच्या दबावात कुणीही राहू नये, रिपोर्टर या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे आवाहन रिपोर्टरच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकशी सोडून शेतकऱ्यांच्या हमीपत्रावर भर
तालुक्यात अनेक गावात पैशासाठी कर्मचाऱ्यांनी बोगसगिरी केलेली आहे. याबाबत बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील कामाची तपासणी करण्यासाठी 7 पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी कामाची पाहणी करायचं सोडून दोन पाणी अहवाल झेरॉक्स करून त्यात शेतकऱ्यांकडून जणू जबाब लिहून घेतले आहेत. पैसे घेणारा कर्मचारी जवळ असताना व अनुदान पडायचे शिल्लक असतांना कुठला शेतकरी पैसे दिल्याचे सांगेल. त्याने हमीपत्रावर आम्हाला ठराविक दुकानदारांकडून साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली नाही, कुणी पैसे मागितले नाही व आम्ही दिले नाही असं लिहून दिलं. या दबावात लिहून घेतलेल्या हमीपत्राच्या पत्रावळ्या दाखवून आम्ही कसे साव आहोत असं जर कृषी विभाग म्हणत असेल तर आपण आता संचालकासमोर याचा भांडाफोड करू. आम्हाला ज्या शेतकऱ्यांनी कबुली दिली आहे ती आता उघड करून तुमच्या दबाव तंत्राचा व बोगसगिरी चा पर्दाफाश केल्याशिवाय रिपोर्टर स्वस्त बसणार नाही\योजनेच्या मुख्य उद्देशालाच फासली हरताळ
ऑफलाईन पध्दतीने कामे करतांना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी पोकरा योजनेची आखणी करण्यात आली होती. अर्ज करण्यापासून ते अनुदान खात्यात जमा होण्यापर्यंत सगळं काही ऑनलाइन करून काम पूर्ण झाल्यावर 8 दिवसात अनुदान खात्यात जमा करण्याची व शून्य टक्के भ्रष्टाचार असे दावे करण्यात आले होते. ज्या हेतूने योजना सुरू झाली त्या हेतुलाच गेवराई तालुक्यातील काही भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हरताळ फासली आहे.