गणेश सावंत -9422742810
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात आमदार होण्याच्या इच्छाशक्तींना प्रचंड धुमारे फुटताना दिसून येत असल्याने विद्यमान आमदारांच्या मानावर इच्छुकांच्या टांगत्या तलवारी पहायला मिळत आहेत. त्यात महाराष्ट्रात पक्षफुटीच्या झालेल्या घटना आणि महायुतीत सामील झालेले नवे पक्ष पाहता उमेदवार एक, दावेदार तीन अन् इच्छुकांच्या बहुगर्दीत फुटीरतेचे बीजही आत्तापासूनच पेरते होत असल्याने विद्यमानांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात सध्या महायुतीकडे पाच तर महाआघाडीकडे केवळ एक आमदार आहे. मात्र या सहाही मतदारसंघात विद्यमान आमदारांना आपली उमेदवारी 2024 साठी निश्चित असेल का? याबबत सांगणे कठीण झाले आहे. महायुतीतील परळीतील एक उमेदवार सोडला तर अन्य पाचही मतदारसंघात धाकधूक कायम असून आमदार कोण? या प्रश्नापेक्षा उमेदवार कोण? यावर प्रचंड उत्सुकता आतापासूनच पहायला मिळत आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात भाजपाचे गेवराईतील लक्ष्मण पवार आणि केजमधील नमिता मुंदडा हे दोन आमदार निवडून आले तर राष्ट्रवादीकडून परळीत धनंजय मुंडे, बीड संदीप क्षीरसागर, आष्टी बाळासाहेब आजबे आणि माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके निवडून आले पाहता राष्ट्रवादीचे बळ जिल्ह्यात अधिक पहायला मिळाले. मात्र अवघ्या दोन वर्षातच महाराष्ट्रात राजकीय कंप झाला आणि शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली, अजित पवार भाजपाच्या काफिल्यात डेरेदाखल झाले अन् राज्याचे समीकरणे पार बदलून गेले. त्यास्थितीत लोकसभेची निवडणूक झाली आणि एकास एक नव्हे तर सर्व एकत्र विरुद्ध आघाडी अशा राज्यभरातल्या मतदारसंघात निवडणुका झाल्या. तिथे मात्र महायुतीला फटका बसला अन् ठाकर-शरद पवारांची आघाडी महाराष्ट्रात बलशाली दिसली. अशा परिस्थितीत 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काय होणार? ही उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. अवघ्या महिनाभराच्या कालावधीत आचारसंहिता लागणार, अशा स्थितीत जो तो आपली उमेदवारी टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीड हा राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे, अशा स्थितीत जागा एक, पक्ष तीन झाल्याने विद्यमान आमदारांना आपली उमेदवारी टिकवण्याबाबत धाकधूक सुरू झाली आहे. तर दुसरीकडे इच्चुकांची बहुगर्दीही पहायला मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या पकडीत असलेला हा जिल्हा पाहता अन् लोकसभेत आलेला निकाल पाहता उमेदवार निवडीची कसरत महाआघाडीसह महायुतीतल्या नेत्यांना असणार आहे. बीडमधून महाआघाडीचे संदीप क्षीरसागर उमेदवार असले तरी याठिकाणी आता भाजप कोण उमेदवार देणार? इथे भाजपाचा उमेदवार असणार की, अजित पवार गटाचा उमेदवार दिला जाणार यावर जो तो आपआपली ताकद लावताना पहायला भेटतो. एवढेच नव्हे तर मीच आमदार म्हणून भाजप, अजित पवार गट यांच्याकडून फ्लेक्स लावले जातात. इच्छुकांची यादी बीडमध्ये सर्वाधिक आहे, ती नावे सर्वांनाच माहित आहेत. तिकडे गेवराईतही भाजपाचा आमदार असला तरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराबाबत त्यांचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांना न पटणारे इथे पंडित आणि लक्ष्मण पवार यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे, अशा स्थितीत नव्या युतीत लक्ष्मण पवारांना उमेदवारी दिली जाईल की, अमरसिंह यांचे बंधू विजयसिंह पंडित यांचा पत्ता महायुतीकडून समोर केला जाईल. इथे काहीही झालं तरी बंडखोरी अटळ असल्याचे बोलले जाते. तिकडे आष्टीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत व्यासपीठावरून माजी आमदार सुरेश धसांनी थेट विधानसभेच्या निवडणुकीत कोण कुठे जाईल, कुणाला उमेदवारी मिळेल हे सांगणे कठीण असले तरी आता एकत्रित या, असे सांगितले जात होते. त्यात देवेंद्र फडणविसांनी नगरच्या सभेमध्ये सुरेश धसांची उमेदवारी घोषीत केली होती. तेव्हा विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या उमेदवारीचे काय होणार? गेल्या वेळेस भाजपाकडून पराभूत झालेले भीमराव धोंडे यांचं भाजप काय करणार? हे प्रश्न आष्टीसाठी उपस्थित आहेत. इकडे माजलगावमध्ये विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके हे महायुतीचे उमेदवार असणार की, भाजपाकडून अनेक वेळा शब्दबद्ध केलेले रमेश आडसकर यांना उमेदवारी दिली जाणार, की अन्य कोणी नवा उमेदवार इथे महायुतीकडून दिला जाईल हे सांगणे कठीण आहे. तसे केजमध्येही नमिता मुंदडा यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार संगिता ठोंबरे रिंगणात उतरल्याचे पहायला भेटते. त्यापाठोपाठ महायुतीतले अन्य नेतेही इच्छुक आहेत. केवळ परळी विधानसभा मतदारसंघ हा महायुतीत निश्चित असल्याचे आज दिसून येते. तेथे राज्याचे कृषीमंत्री तता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे 2024 साठी निश्चित उमेदवार मानले जातात.
प्रश्न असा आहे, एक जागा त्यात भाजप, अजित पवार गट, शिंदे गट असल्याने उमेदवार कोण असणार? याची निश्चिती आज देता येत नाही. तसे ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हेही बीड जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रामुख्याने शरद पवार यांच्या गटातील प्रदेशाध्यक्षांनी म्हणजे जयंत पाटलांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचा दौरा केला. नव्हे नव्हे तर उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यात आता काँग्रेस बीडमध्ये जागा मगत असून परळीसाीं राजेसाहेब देशमुख हे कामाला लागले आहेत. तर गेवराईतही काँग्रेस इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. प्रामुख्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं लक्ष या मतदारसंघावर अधिक असल्याने याठिकाणी त्यांची भूमिका 2024 च्या निवडणुकीत अधिक महत्वाची राहणार आहे. जातीय समीकरणे, मराठा-मुस्लिम-वंजारा-ओबीसी या मतांचे एकीकरण आणि धु्रवीकरण याला अधिक महत्व प्राप्त होईल. ज्याला हे गणित जमेल तो उमेदवारांच्या बहुगर्दीत यशस्वी होईल. परंतु आजमितीला तरी विद्यमान आमदारांच्या मानावर इच्छुकांच्या तलवारी आहेत.