मुंबई (रिपोर्टर) ठाकरे सरकारनं शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला राज्यात नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव तसंच नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असं नामांतर करण्याच्या निर्णयाला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारनं अखेरच्या क्षणी नियमबाह्यपणे हे निर्णय घेतले असून ते स्थगिती करुन नव्यानं निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचं पत्र दिल्यानंतर सरकारला कॅबिनेट बैठक घेता येत नाही. असं असतानाही ठाकरे सरकारनं बैठक घेतली आणि लोकप्रिय निर्णय घेतले. यावर आक्षेप घेत ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच याबाबतचं सूतोवाच केले होते. दरम्यान, हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे सरकार कोसळण्याआधी 29 जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता.
औरंगजेब सरकारचा नातेवाईक कसा काय झाला?; संजय राऊतांचा शिंदे सरकारला टोला
ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव दिलंय, हे निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्व द्रोही, महाराष्ट्र द्रोही आहे हे सिद्ध झालंय. औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता यासाठी भाजपा विचारत होती. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, हे निर्णय बदलून काय साध्य केलं हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसर्या बाजूला हा निर्णय बदलला. औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय असा घणाघात त्यांनी केला. त्याचसोबत संसदेत यापुढे काहीही करता येणार नाही, हात पाय बांधून तोंडावर चिकट पट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. यादेशात आणीबाणी पेक्षा जास्त भयानक स्थिती आहे आणीबाणी सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतलाय. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल. चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बर्याच गंमती जमती राज्यात पाहायला मिळतेय. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार असा टोला राऊतांनी लगावला.