बीड (रिपोर्टर): राजकारण आणि सत्ताकारणाची महत्वकांक्षा ठेवणार्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने युती असलेल्या पक्षात तू तू मै मै चालू झाली आहे. तर काहींकडून पक्षापेक्षा थेट जरांगे पाटलांना अधिक महत्व दिलं जात आहे. जागा एक, पक्ष तीन असल्याने आणि इच्छुकांची बहुगर्दी असल्याने बीड जिल्ह्यात उमेदवारीबाबत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर होण्याचे चिन्ह सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत पहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघ असून या सहाही मतदारसंघांवर कधी भाजपाचे तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व नव्वद टक्क्यांपर्यंत राहिलेलं आहे. आता भाजपाबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी सामील झाल्याने महायुतीत उमेदवारी कोणाला द्यायची, हा प्रश्न पक्षासमोर असणार आहे. परंतु लोकसभेपर्यंत एका व्यासपीठावर येऊन गळ्यात गळे घालत महायुतीला मते मागणारे आता एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. आष्टीमध्ये धस-आजबे यांचे आरोप-प्रत्यारोप गेल्या आठ-पंधरा दिवसात पहायला मिळाले. इकडे गेवराईमध्येही तीच परिस्थिती आहे तर तिकडे माजलगावमध्ये तिकिटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जी स्थिती महायुतीची आहे तीच स्थिती महाविकास आघाडीची पहावयास मिळते. इथे ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला तेवढा वाव नसला तरी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ठाकरे-पवारांचं महत्व इथे अधिकतेने वाढताना दिसतं. त्यामुळे अन्य इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. याउलट भाजपाकडून तर थेट जरांगे पाटील यांनाच गळ घातली जात असल्याचे दिसून येत आहे. काल भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक राजेंद्र मस्के हे जरांगे पाटील यांच्याकडे गेले, त्यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ केजच्या भाजपाच्या माजी आ. संगिता ठोंबरे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावरून बीड जिल्ह्यात आमदारकी लढवण्याबाबत अनेक जण महत्वाकांक्षी असल्याचे दिसून येते.