गणेश सावंत –
तळपायाची आग मस्तकाला जावी, मस्तकाच्या नसा ताणून फाटाव्यात, हाताच्या मुठी वळल्या जाव्यात, दिसला तो नराधम की अक्षरश: त्याच्या नरडीचा घोट घ्यावा, असा संतापजनक प्रकार काल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बदलापुरात उघडकीस आला. चार ते सहा वर्षाच्या दोन विद्यार्थिनींवर त्याच शाळेतल्या सफाई कामगारांनी बलात्कार केला. घयना इतकी गंभीर परंतु अजाणत्या लेकरांवर ओढावलेला प्रसंग जाणत्यार्पंत तेव्हा गेला जेव्हा त्यातली एक मुलगी आपल्या आईला म्हणाली, ए आई, माझ्या शूच्या जागी मुंग्या येतायत, तिथं दुखतय, तेव्हा तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेलं तेव्हा हा सर्व संतापजनक प्रकार समोर आला, त्या लेकराला बोलतं केलं, तेव्हा तिनं शाळेतल्या. ….काकाने त्रास दिल्याचे म्हटले. इथे त्या लेकराची चूक ती का? ते लेकरू अजाणतं, परंतु शेण खाणारा नराधम जाणता होता. ही मानसिकता येते कुठून? रोज कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडतायत, आणि आम्ही राज्यकर्ते म्हणवून घेणारे छातीठोकपणे कधी ‘लाडली बहीण’ची ओवाळणी देतोय, कधी बोळवण करतोय, तर कधी या राज्यात आणि या देशात सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवतोय. बलात्कार होतो, त्या महिलेची अब्रू जाते, तिला त्रास होतो, तिचा जीव जातो, आम्ही काय करतो. आम्ही संतापतो, मोर्चे काढतो, कँडलमार्च काढतो, धरणे देतो, रास्ता रोको करतो, आरोपीला ठोरातील कठोर शिक्षा द्या म्हणत पुन्हा दुसर्या बलात्कार्याची वाट पाहतो. परंतु ज्या स्वराज्यात बलात्कार्यांचे हातपाय तोडले गेले, त्या राज्यात

बलात्कार्यांना कायद्याचा धाक
आजमितीला दिसत नाही, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये रांझेगावच्या पाटलाने महिलेच्या अब्रूवर हात घातला, तसा शिवरायांनी त्याचा चौरंगा केला. याला शिक्षा म्हणतात. पुन्हा स्वराज्यामध्ये महिलेवर हात घालण्याची हिंमत कुणाची झाली नाही, इथे कोपर्डीचा बलात्कार चर्चेत आला, त्यावर मोर्चे, धरणे आणखी काहीबाही झाले. त्या बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत बलात्काराच्या किती घटना घडल्या. हा आकडा सांगायचा म्हटलं, तर आमची आम्हाला शरम येईल. लज्जा वाटेल. खरचं आम्ही छत्रपती शिवरायाचां महाराष्ट्र हाकतोय का? त्यावर सत्ताधीश म्हणून राहण्याची आमची लायकी आहे का? हे प्रश्न स्वत:ला पडतील, मुख्यमंत्री कोणीही असो, कुठलाही पक्ष सत्तेत असो, ती महाआघाडी आहे की महायुती आहे? ते भाजप आहे की काँग्रेस आहे, शिवसेना आहे की राष्ट्रवादी आहे का तो सत्ता भोगणारा गट आमक्याचा आहे, प्रश्न इथं एवढाच आमच्या आया-बहिणी या महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, आमचे लेकरं या महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत, म्हणून तर आज बदलापुरातल्या बलात्काराची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर महिला रस्त्यावर आल्या, दीड हजाराची ओवाळणी नको म्हणत बलात्कार्यांना फाशी द्या म्हणाल्या, ही चीड आजच्या बलात्कार्यांवरची असली तरी
बलात्काराची मानसिकता
कोणाची आणि कशी ? यावर विचार मंथनापेक्षा बलात्कार करणार्या नराधमाची मानसिकत आता त्याच्या एकट्याशी जोडली जाता कामा नये. बलात्कार करणारा पुरुष असतो आणि त्या कामांधाच्या वासनेला बळी पडलेली स्त्री असते. तेव्हा हा पुरुषोत्वाचा आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा विषय येतो. म्हणजे याला सर्व पुरुष तुम्ही-आम्ही जबाबदार असू, असं प्रत्येकाने आता मानून घेतलं पाहिजे. 24-25 वर्षाचा कंत्राट बेसेसवर शाळेत सफाई कामगार म्हणून घेतलेला हा नराधम जेव्हा चार ते सहा र्वेाच्या मुलीवर वाकडी नजर टाकतो, त्याचे कौमार्य हिरावून घेतो, ही त्याची जरी मानसिकता असली तरी ती मानसिकता तेव्हाच तयार झाली इथे बलात्कार्यांना कठोरातली कठोर शिक्ष होत नाही, इथे पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांना इज्जत दिली जात नाही. काहीही झालं तरी महिलांवरच दोषारोप केले जातात,
ती पोरगीच तशी….
म्हणत तिच्या राहणीमानापासून कपड्यापर्यंत टीका-टिपणी केली जाते. ती किती तंग कपडे घालते, तिची हेअरस्टाईल कशी, तिच्या ओठाला लिपस्टिकीक कुठली, तिच्या कानातल्या बाळ्या कशा? ती ओढणी गालते की नाही? ती चालते कशी? ती हसते कशी? यावर व्यक्त होत आम्ही मदमस्त पुरुष केवळ आमचीच जवानी चेकळली या आविर्भावात मुलींना दोष देतो. परंतु पुरुषप्रधान संस्कृतीतले महिलांवर टिपण्या करणारे भाडखाऊ हा विचार करत नाहीत. निसर्गाचा नियम काय, मुलिंना किंवा मुलांना घरातून संस्कार कसे? तिचा मित्र परिवार कसा? आणि त्यातून तिची चालढाल कशी? यावर भाष्य होत नाही. ती मुलगी आहे ना बस्स मग! आपण लाळ गाळायची, तिला नखशिखांत पहायचं, तिच्या सौंदर्याशी वासनेसोबत जोडगोळी लावायची, आणि आपली चेकाळलेली वासना आपल्या इजारीतच शमवायची. यातून खरे तर बलात्कारी निर्माण होतात. जोपर्यंत समाज मुली-महिलांना इज्जत देणार नाही, तुमच्या लाळगाळ्या व्यक्तीमत्वाला पुर्णविराम देणार नाही तोपर्यंत या बलात्कार्यांचा जन्म पदोपदी होईल. एकीकडे आई, बहीण, मुलगी, पत्नी म्हणून प्रत्येक स्त्रीजातीकडे आपण पाहतो आणि दुसरीकडे त्याच स्त्रीला भोगाची वस्तू म्हणत व्यक्त होतो. काल-परवाचं लेकरू चार ते सहा वर्षे म्हणजे तिनं कुठलं ते जग पाहितलं ओ, तिला कुठली वासना, तरीही पुरुष म्हणवून घेणार्या त्या नराधमाने तिचे लचके तोडलेच की. खरं तर बलात्कार हा
राजकीयच गुन्हा व्हावा
आमच्या या वक्तव्याचं तुम्हाला हसू येत असेल, होय, आम्ही जबाबदारीने म्हणतो, हा राजकीय गुन्हा असावा, म्हणजे आजच्या राजकीय व्यवस्थेमुळेच बलात्कारी चेकाळतायत. सत्तेत असलेल्या मग तो कुठलाही पक्ष असो, कुठलाही नेता असो, त्यांनी गेल्या 75 वर्षांच्या कालखंडात या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहितलंच नाही. कठोरातली कठोर कारवाई बलात्कार्यावर व्हावी, अथवा अशी एखादी शिक्षा एखाद्या बलात्कार्याला द्यघावी, की पुन्हा कोणाची माय व्यायली नाही बलात्कार करायला. परंतु नाही, आम्ही फक्त आश्वासने देणार, याला आदेश दिले, त्याला आदेश दिले, हे माध्यमांना सांगणार, आम्ही फक्त बोलणार आणि पुन्हा पुन्हा तेच होणार. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे अधिक महत्वाचे. कधी काळी त्या बिचारीला हुंड्यामुळे जाळण्यात यायचे, तिचा जीव घेतला जायचा. त्या हुंड्याची एवढी दहशत होती की, आजच्या पिढीतल्या लोकांनी स्वत:च्या मायांना विचारवं. हुंडा पद्धतीमध्ये बदलाव होऊ शकत असेल तर मग बलात्कारासारख्या संतापजनक प्रकाराकडे बदलाव करण्याबाबत मग त्या नराधमांच्या मानसिकता ठेचण्याबाबत बदलाव का होत नाहीत? कलकत्त्यातील डॉक्टर तरुणीची बलात्कार आणि हत्येने अवघा देश हादरून गेलेला असतानाच महाराष्ट्रात ही घटना घडावी. हे संतापजनकच.