ना. मुंडेंमुळे जिल्ह्यात प्रथमच राज्यस्तरीय कृषी महोत्सव
परळी (रिपोर्टर): राज्यातील शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवत कृषीमंत्री धनंजय मुंडे हे खाते सांभाळतात तेव्हापासून शेतकर्यांच्या हितासाठी निर्णयाबरोबर आधूनिक शेतीसाठी शेतकर्यांना माहिती आणि शिक्षण मिळावं म्हणून काम करत असून त्या दृष्टीने परळीमध्ये आजपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त देशाचे कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे परळीत डेरेदाखल होत आहेत. तत्पूर्वी शहरातून कृषी दिंडीला सुरुवात झाली आहे.
राज्याचं कृषीखातं सांभाळताना ना. धनंजय मुंडेंनी अनुदान, पीक विमा अथवा नैसर्गिक आपत्तीकडे जेवढे लक्ष दिले तेवढेच मुंडेंनी शेतकर्यांच्या अडीअडचणीबरोबर शेतात कुठली पिके घ्यायला हवीत, पशुधनाचा सांभाळ कसा करावा? सेंद्रिय शेती कशी करावी? उत्पादन खर्च अथवा रानभाज्या, भाजीपाला इथपर्यंत शेतकर्यांना अधिक अधिक माहिती व्हावी यासाठीही राज्यभरात विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच धर्तीवर आज परळी शहरात राज्यस्तरीय पाच दिवसांचे कृषी प्रदर्शन सुरू होत आहे. बीड जिल्ह्यात शासनाचे राज्यपातळीवर कृषी प्रदर्शन हे प्रथमच होत आहे. त्यामुळे प्रचंड उत्साह या प्रदर्शनाच्या अनुषंगाने शेतकर्यांमध्ये दिसून येत आहे. दुपारी तीन वाजता देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौव्हान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाची सुरुवात होत आहे. तत्पूर्वी शहरातून कृषीदिंडीला सुरुवात झाली असून याच कार्यक्रमात नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकर्यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन वितरण पोर्टलचे अनावरण होत असून या कृषी प्रदर्शनामध्ये पशूप्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्र, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकर्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यासह अनेक उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून हजारो शेतकर्यांनी कार्यक्रमस्थळी धाव घेतली आहे.