मध्यप्रदेशातल्या इंदौरमधून अंमळनेरकडे येत होती बस
मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश
पुणे (रिपोर्टर) मध्यप्रदेशातल्या इंदौरमधून महाराष्ट्रातील अंमळनेरकडे निघालेली बस मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घारगावजवळ आली असता समोरून येणार्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात सदरची बस ही नर्मदा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 25 जण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. या बसमध्ये 13 लहान मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत असून महाराष्ट्राच्या बसला अपघात झाल्याने शासन-प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आपल्या अधिकार्यांना घटनास्थळाकडे पाठवले आहे.
पुण्याजवळील अंमळनेर येथून इंदौर-अंमळनेर ही बससेवा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मध्यप्रदेशमधील इंदौर येथून आज सकाळी बस (क्र. एम.एच. 40 एन. 9848) ही गाडी अंमळनेरसाठी निघाली. मध्यप्रदेशातल्या धार जिल्ह्यातील घारगावजवळ नर्मदा नदीच्या पुलावरून ती पुढे मार्गक्रम करत असताना समोर चुकीच्या मार्गाने एक वाहन आले. त्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट नर्मदा नदी पात्रात जावून पडली. अपघात एवढा भीषण होता की बसचा अख्खा चक्काचूर झाला. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच 15 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.बस इंदौरहून जळगावला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये 50-55 जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. ही दुर्घटना खाल घाटात बांधलेल्या नर्मदा पुलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस इंदौरहून महाराष्ट्राकडे जात होती. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. खरगोनचे जिल्हाधिकारी कुमार पुरषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे. 25 पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याचा कयास काढला जात असून पाऊस सुरू असल्याने नर्मदा नदी वाहत आहे. पाण्याला वेगही आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. याबसमध्ये 13 लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या बसचे चालक आणि वाहक हे महाराष्ट्रामधील आहेत. चालकाचे नाव चंद्रकांत एकनाथ पाटील तर वाहकाचे नाव प्रकाश श्रावण चौधरी असे आहे. या दोघांशीही संपर्क दुपारी एक वाजेपर्यंत होऊ शकलेला नाही. अपघाताची भयानता पाहता मध्य प्रदेश सरकारने घटनास्थळी बचाव आणि शोध कार्याला वेग दिला आहे. तर महाराष्ट्र शासनाचे आणि एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले.