बीड (रिपोर्टर) गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगला पाऊस पडत आहे. या पावसाने अनेक नद्यांना पाणी आले. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्या माजलगावच्या धरण पातळीत काही प्रमाणात वाढ झाली तर केज तालुक्यात सर्वाधिक मोठं धरण असणार्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मांजरा धरणातून केज, धारूर आणि इतर ग्रा.पं.ना पाणीपुरवठा केला जातो.
बीड जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. माजलगाव धरणातून बीड शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्यावर्षी माजलगाव धरण पुर्णत: भरलेले होते. उन्हाळ्यामध्ये या धरणातील पाण्याचा साठा बराच कमी झाला होता. चार दिवसांपुर्वी पडलेल्या पावसामुळे धरणाच्या वरील नद्यांना चांगले पाणी आल्याने माजलगावच्या धरणात चांगल्या प्रमाणात पाण्याचा साठा जमा झाला तर केज तालुक्यातील मांजरा धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. या धरणामध्ये पुर्वीचा 30 ते 35 टक्के पाण्याचा साठा होता. मांजरा धरणातून केज, धारूरसह इतर बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. काही पाणी लातूर जिल्ह्याकडेही जात आहे हे धरण केज तालुक्यात सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं. दुष्काळामध्ये या धरणामध्ये पाण्याचा एक थेंबही नव्हता मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे धरण पुर्णत: भरत असल्याने परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धरणामुळे सुटला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात 2.9 मि मी पावसाची नोंद
बीड, दि. 19 (जि. मा. का.) : जिल्ह्यात आज दि. 19 जुलै 2022 रोजी सकाळी 8 : 00 वाजेपर्यंत मागील 24 तासात सरासरी 2.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 167.8 मि. मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 19 जुलै 2022 रोजी सकाळी 8 :00 वाजेपर्यंत मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुलैपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. बीड 2.3 (150.3), पाटोदा 2.2 (133.2), आष्टी 4.0 (84.9), गेवराई 2.5 (177.6), माजलगाव 4.4 (177.1), अंबाजोगाई 0.8 (223.8), केज 1.6 (239.3), परळी 5.5 (209.1), धारूर 1.7 (166.3), वडवणी 7.7 (176.7), शिरूर कासार 2.0 (86.3).