इथे निष्ठा सह्याद्रीसारखी चिवट आणि निब्बर होती. इथे निष्ठेलाच मान-पान आणि सन्मान होता. याच महाराष्ट्रात निष्ठेसाठी बलिदान दिले जायचे. आता मात्र निष्ठा सत्ता केंद्रांची विष्टा होऊन बसली. केवळ सत्ता हाच ध्यास धरत जो तो निष्ठेच्या गळ्यावर पाय देतोय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून सुरु झालेला सत्ताकेंद्राचा बेफाम बाजार आणि त्या बाजारात उतरवले जाणारे निष्ठेचे कपडे महाराष्ट्राला लाजवून सोडत आहे. कोण कुठल्या पक्षाचा? यापेक्षा कुठल्या पक्षाकडे गेल्यानंतर सत्ता येते आणि त्या सत्तेच्या शय्येवर आपल्याला निजता येतं, एवढच धोरण आजच्या पुढार्यांचं पहायला मिळतं. गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकारणात जे आमुलाग्र बदल झाले त्या बदलात तीन वर्षापती झाले. आता पुन्हा एकदा 2024 मध्ये वर्षापतीसाठी स्वयंवर होत आहेत आणि तो स्वयंवर म्हणजे विधानसभेच्या निवडणुका. पाच वर्षाच्या कालखंडात राज्यातून बदललेले पक्षीय समीकरणे आणि आरक्षणाचे आंदोलने या निवडणुकीमध्ये चांगलेच चर्चीत राहणार. त्यामुळे अनेक पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी
पक्षासाठी फासे
टाकण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. इकडे महायुतीमध्ये भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी उद्याची निवडणूक कुठल्यही परिस्थितीत जिंकण्यासाठी जिवाचे रान करत आहे तर तिकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांची राष्ट्रवादी सत्ताधार्यांना खिंडीत पकडत त्यांच्यातील नाराजांना आपल्या फाश्यात अडकवण्यास सुरुवात केली आहे. या स्थितीत निष्ठा ही कुठेच दिसून येत नाही. दिसून येतो तो केवळ प्रत्येक पक्षाचा जांगडगुत्ता आणि इच्छुकांच्या कोलांटउड्या. रात्रीपर्यंत या पक्षात असलेला सकाळी दुसर्या पक्षात जाण्यास तयार असल्याचे चित्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. सत्ताधारी महायुतीला बंडखोरी रोखण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करावी लागत आहे तर विरोधक आघाडीला तीन पक्षातल्या इच्छुकांना अंबाळावे -चोंभाळावे लागत आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील राजकारणातल्या ज्येष्ठांनी आणि प्रत्येक पक्षाने जे पेरलं ते उगवण्यास आता सुरुवात झाली आहे.
पक्षफुटी अन् तीन पक्षांची युती
आघाडी आणि महायुतीत असल्याने प्रत्येक मतदारसंघात दोघांकडूनही तीनपेक्षा अधिक इच्छूक दिसून येत आहेत. त्यामुळे महायुतीला आणि आघाडीला उमेदवारी नेमकी द्यायची कोणाला? यावर चिंतन मंथनापेक्षा डोकेदुखीच अधिक ठरत आहे. जिथे विद्यमान आमदार अजित पवारांचा असेल तिते भाजपाचा दावेदार आणि जिथे भाजपाचा विद्यमान आमदार असेल तिथे अजित पवार गटाचा दावेदार महायुतीचा फेस काढत आहे. यात महायुतीपेक्षा भाजपा विरुद्ध असलेला तीव्र असंतोष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीचा होऊ झालेला कडेलोट आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला ताकही फुंकून पिण्यास लावत आहे. त्याचा फायदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे राज्यभरात बर्यापैकी घेताना दिसून येत असून ज्याला महायुतीत उमेदवारी नाही त्याला आमच्याकडे उमेदवारी म्हणत कोपराला गुळ लावत आहे. त्यामुळे जो तो महायुतीत बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहे. एकतर लोकसभेत बसलेला फटका आणि इच्छुकांची बहुगर्दी, त्यात
आरक्षणाच्या आंदोलनाची डोकेदुखी
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडचे पाणी पळवताना दिसून येते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनाने मराठ्यांना एका रांगेत उभे केले. त्यांच्या सोबतीला मुस्लिम समाज तेवढ्या ताकतीने उतरला. त्यामुळे उद्या निवडणुकीमध्ये शिंदे-अजित पवार आणि भाजपाला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड तारेवरची कसरत करावी लागणार. यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यातही जिल्ह्या जिल्ह्यात महायुतीतली बंडखोरी पाहता या तिघांनीही यावर मताचे धु्रवीकरण हे उत्तर शोधले. आरक्षणाच्या आंदोलनाची महायुतीला जेवढी डोकेदुखी तेवढीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला. कारण पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे सत्ताकारणी आहेत ते प्रस्थापीत आहेत. मग ते मराठा असोत अथवा अमराठा, त्यांच्याकडे कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहे, नव्हे नव्हे तर गेली कित्येक वर्षे ते आपआपल्या तालुक्यावर आधिराज्य गाजवित आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्याच प्रस्थापीतांना टार्गेट केले आहे. त्यामुळे तिथेही आघाडी सुखरुप आहे, असे म्हणता येणार नाही. पक्षाच्या जांगडगुत्त्यात
इच्छुकांच्या कोलांटउड्या
आपण नुसत्या बीडच्या पाहिल्या. तर उभ्या महाराष्ट्राचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर तरंगून जाईल. गेवराईत भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवारांनी घेतलेली निवडणूक न लढवण्याची भूमिका आणि त्यानंतर त्यांनी वाढवलेली शरद पवारांशी जवळीक ही कोलांटउडीची पहिली पायरी, तिकडे माजलगावमध्ये भाजपाचे मोहन जगताप यांनी काल घेतलेला मेळावा आणि त्या मेळाव्यातून भाजपाविरोधात केलेली बंडखोरी कोलांटउड्याचा परिपाठ लिहणारी त्याच माजलगावमध्ये अजित पवारांचे खंदे समर्थक प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीतून घेतलेली निवृत्ती आणि पुतण्याला ठरवलेले वारस हा कोलांटउडीचा भाग येत नसला तरी सोळंके पुन्हा निवडणूक रिंगणात निवृत्तीची कोलांटउडी घेताना दिसून आले तर ते आश्चर्याचे नक्कीच नसेल. तिकडे आष्टीत कोलांटउडीच्या तयारीत दोन मातब्बर माजी आमदार आणि केजमध्ये असलेल्या इच्छूक महिला आणि त्यांचे वेगवेगळ्या पक्षांसोबत सुरू असलेले बोलणे कोलांट उड्याचा इतिहास रचणारा ठरेल. इथे बीडमध्ये कोणी कोलांटउड्या मारत नसले तरी क्षीरसागरांच्या घरामध्ये सुरु असलेली गुफ्तगू आणि वरिष्ठ नेत्यांची आगामी निवडणूकीत ‘बदला’ राजकारण दुसर्या आणि तिसर्या फळीतल्या अनेकांना ऐनवेळी कोलांटउडी टाकणारी ठरेल.