आष्टी (रिपोर्टर): आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीत उमेदवार कोण? हा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यास्थितीत माजी आ. सुरेश धसांनी काल ‘होऊन जाऊ द्या, तिघांना स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या, मग कोणाची किती ताकद हे दिसून येईल,’ असे आपण पक्ष श्रेष्ठीकडे मांडणार असल्याचे म्हटले होते. मात्र आज सुरेश धसांच्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. ‘पक्षाने आदेश दिल्यास दुसर्याचा प्रचार करील’, या एक ओळीच्या पोस्टने त्यांच्या समर्थकात खळबळ उडवून दिली आहे. धसांनी माघार घेतली की, धसांचा हा डाव आहे, यावर जिल्ह्यात उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहे.
आज सकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजी आमदार सुरेश धस यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट झळकली. त्या पोस्टमध्ये एका ओळीत एवढेच म्हटले आहे, ‘पक्षाने आदेश दिल्यास दुसर्याचा प्रचार करेल’ त्यांच्या या पोस्टने समर्थकांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. अण्णा आता माघार नको, लढू आणि जिंकू, आमचा पक्ष तुम्हीच आणि सरकार पण तुम्हीच. अण्णा आता माघार नाही, तुम्ही अपक्ष उभा रहा, पक्षाचं काही ऐकू नका, ते स्वत:च्या सोयीनुसार वागतात, माघार नको, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया त्याखाली समर्तक कार्यकर्ते देताना दिसून येतात. कालच अनेक समर्थकांनी त्यांच्या घरी गर्दी करत आता माघार नाही निर्धार म्हणत निवडणूक लढविण्याबाबत आग्रह धरला होता. त्यावर धसांनी होऊन जाऊ द्या, तिघांनाही निवडणूक लढवण्याची परवानगी द्या, अशी विनंती आपण पक्षाला करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज धसांनी ही पोस्ट करून निवडणुकीतून माघार घेतली की डाव टाकला यावर चर्चा होत आहे.