बीड/परळी (रिपोर्टर): महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाले आहेत. त्यांची पहिली सभा ही कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या परळीत होत असून ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पवार हे बीड मुक्कामी असल्याने या मुक्कामात पवार कुणाला मुक्का आणि कुणाला बुक्का लावणार यावरही चर्चा सुरू झाल्या आहेत.
परळी शहरातल्या मोंढा मैदानात शरद पवारांची जाहीर सभा होत आहे. तिथे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून शरद पवार धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यामध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुपारी शरद पवारांची सभा ही आष्टी येथील त्यांच्या उमेदवारासाठी होत असून संध्याकाळी बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परळी येथे सभा ऐकण्यासाठी लोक जमा होत आहेत. बीडमधील मुक्काम आणि परळीतील भाषणाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.