गेवराई (रिपोर्टर): राजकारणात संवेदनशील असलेला मतदारसंघ म्हणून गेवराई मतदारसंघाकडे पाहितलं जातं. आता या मतदारसंघाने आणि तेथील मतदारांनी कर्तृत्व कर्माला आणि मतदार संघाच्या भविष्याला अधिक महत्व द्यायचं ठरवलं म्हणूनच विकास हा आमचा धडा आहे, त्यासाठीच विजयसिंह पंडित खडा है असं म्हणत आता जात ना पात, धर्म ना पंथ, कर्तृत्व हेच आम्ही पाहणार असल्याचे सांगत थेट मतदारांनी विजयी निर्धार केल्याचे दिसून येत आहे. विजयसिंह पंडितांच्या ठिकठिकाणच्या गाव बैठकांसह ते जिथे उभे राहतील, तेथे जमा होत असलेल्या गर्दीतून मतदारसंघासाठी तरणाताठा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळाल्याच्या प्रतिक्रियाही लोकातून आता व्यक्त होताना दिसून येत आहेत.
गेवराई विधानसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे भाजपाचा वरचष्मा राहिला. मात्र ज्या अपेक्षेने पंडितांना डावलून मतदारांनी भाजपा आमदाराला या ठिकाणी निवडून दिले त्यांनी मतदारसंघाचा आणि मतदारांचा अपेक्षाभंग केला. अशा थेट प्रतिक्रिया आता मतदारातून व्यक्त होताना दिसून येत आहेत. दुसरीकडे सिंचनाला महत्व देत मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्याहेतू माजी आमदार अमरसिंह पंडितांनी सिंधफणा आणि गोदावरी नदीवर ज्या पद्धतीने बांध टाकले, काही भागामध्ये हरितक्रांत घडवून आणली, सत्ता नसताना गेवराईसह मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नाला वेळोवेळी महत्व दिले. त्यामुळे आता मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्यांनी आता केवळ विकासाला महत्व द्यायचे ठरवले. विजयसिंह पंडित हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी या मतदारसंघात तेव्हाही मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. शेती, शिक्षण, सिंचन हे विकासाचे प्रमुख तीन सुत्र विजयसिंहांनी वेळोवेळी आपल्या डोळ्यासमोर ठेवले. मतदारसंघामध्ये जिथे जातील तिथे या तिन सुत्रावर आपल्याला काम करायचे आहे आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलायचा आहे, हे व्हिजन विजयसिंह मोठ्या सभांमध्ये नव्हे तर गाव बैठक, चावडी बैठक आणि हॉटेलच्या कट्ट्यावरही लोकांशी संवाद साधताना मांडत असल्याने गेल्या दहा वर्षाचा कालखंड गेवराई शहराला आणि मतदार संघाला विकासापासून दूर लोटणारा ठरल्याच्या थेट प्रतिक्रिया आता लोक देत आहेत.