मंडळ अधिकारी राठोड यांच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला
जातेगाव (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे तलाठी सज्जाला कायमस्वरुपी तलाठी नसल्याने शेतकर्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. सज्जाला कायमस्वरुपी तलाठी द्यावा या मागणीसाठी आज गढी-माजलगाव हायवे रोडवरील सिरसदेवी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सिरसदेवी सज्जाला कायमस्वरुपी तलाठी द्या अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र महसूल विभागाकडून याची दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी अकरा वाजता सिरसदेवी फाट्यावर सरपंच रविंद्र गाडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मंडळ अधिकारी सुनिता राठोड यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारत कायमस्वरुपी तलाठी देण्याचे आश्वासन दिले. या वेळी तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, उपनिरीक्षक भवर यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनामध्ये जगन अडागळे, बालाजी सातपुते, अमोल कदम, सुभाष चव्हाण, महादेव मुडाळे, माऊली मोरे, जगदीश वेताळ, गणेश वळेकर, नजीर शेख, राम कदम, भागवत कांबळे, सचिन आडागळे, दामू मोरे, भगवान रुचके, पिंटू आडागळे, राम आडागळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.