गावात आक्रोेश, धनंजय एका टाकीवर तर गावकरी दुसर्या टाकीवर
गावकर्यांची सरकार आणि प्रशासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी
महिलाही आंदोलनात उतरल्या, मनोज जरांगे आंदोलनस्थळी
एसपींकडून देशमुख कुटुंबियांच्या विनवण्या
मस्साजोग (रिपोर्टर): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील फरारी आरोपी आंधळे यास तात्काळ अटक करा, वाल्मिक कराड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, शासकीय वकील म्हणून अॅड. उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करा व एसआयटीत पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करा, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केलं आहे. अन्य एका टाकीवर गावकरी चढले असून अवघं गाव रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. घयनास्थळावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत हे आंदोलकांना समजावत असून खाली येण्याबाबत विनंती करत आहेत.
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करत सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, या प्रमुख मागणीसाठी टॉवरवर चढून आपण आत्महत्या करणार असल्याचे कालच मयत सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानुसार रात्रीपासून मस्साजोग या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तेथील टॉवरला पोलिसांनी कडे टाकले होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस टॉवरजवळ होते. मात्र सकाळी धनंजय देशमुख हे अचानक घरातून गायब झाले. प्रशासनाने त्यांची शोधाशोध करायला सुरुवात केली. मात्र ते मिळून आले नाहीत. दहा – साडेदहा वाजण्याच्या सुमारास धनंजय देशमुख हे टॉवरवर नव्हे तर प्रशासनाला हुलकावणी देत गावाला पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीवर चढल्याचे स्पष्ट झाले. देशमुख यांच्या समवेत त्यांचे दोन साथीदार त्यांच्या सोबत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीत. असा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतला आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अकरा वाजण्याच्या सुमारास मस्साजोग येथे डेरेदाखल झाले. आंदोलनस्थळी जात त्यांनी धनंजय देशमुखांना खाली येण्याबाबत विनवणी केली. मात्र धनंजय देशमुख ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसून आले नाहीत. जिल्हा पोलीस अधिक्षक नवीनीत काँवत हेही घटनास्थळी डेरेदाखल होत आंदोलकांना खाली येण्याबाबत विनवणी करताना दिसून येत आहेत. मस्साजोगमध्ये घोषणाबाजी आणि गावकर्यांचे संतप्त आंदोलन सुरू असून या आंदोलनात महिला-पुरुष सहभागी झालेले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीखाली आले नव्हते.