तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याचा प्रयत्न एकीकडे केला जात असतानाच काल सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास बीड शहरातल्या राजीव गांधी चौक ते नगरनाका परिसरात दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाने गावठी पिस्टलातून गोळीबार केल्याची तक्रार फिर्यादीने दिली. मात्र पोलीसांना तपासामध्ये गोळीबार झाल्याचे कुठेही निदर्शनास आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. गोळीबार झाला की नाही यावर तपास सुरु असतानाच शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले आहे.
अभिजीत शरद पवार (रा. चर्हाटा फाटा) व बळी पिंगळे यांच्यामध्ये जुन्या भांडणाचा वाद आहे. काल दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान पवार आणि पिंगळे यांच्यात वाद झाला. या वादाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळ गाठले. वाद उफाळला गेल्याने राजीव गांधी चौक ते नगरनाका परिसरात काल दुपारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांमधून गोळीबार झाल्याची चर्चाही सुरू झाली होती. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी डेरेदाखल झाल्यानंतर या प्रकरणी अभिजीत शरद पवार याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्याने आपल्या फिर्यादीत म्हटले, जुन्या भांडणाच्या कारणावरून बळी पिंगळे याने हवेत गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गणेश भारत गिरी व बळी पिंगळे, रोहन जाधव या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश गिरी व बळी पिंगळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार झाल्याचे फिर्यादीकडून सांगण्यात येते, मात्र पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना काडतूस मिळून आलं नसल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांकडून प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.