परळी (रिपोर्टर): जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी जनसंवाद प्रकल्पांतर्गत जनतेला दिलेल्या क्यूआर कोडची सुविधा आता रंग आणताना दिसून येत असून अज्ञात व्यक्तीने क्युआर कोडद्वारे परळीच्या धर्मापुरीत एका किराणा दुकानावर मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. त्या वेळी तब्बल 14 लाख रुपये किंमतीचा गुटखा घटनास्थळी दिसून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून गुटख्याची अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तपासणी करून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याचे माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख लाल, निमोणे, विष्णू घुगे, पांडुरंग वाले ,गोविंद बडे सुनील अन्नमवार यांच्या पथकाने 12 फेब्रुवारी रोजी रात्री या किराणा दुकानावर छापा टाकला. यावेळी शासनाची बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येथे आढळून आले. याची किंमत अंदाजे 14 लाख रुपये आहे. हा सर्व गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणारे दोघेजण असून त्यांच्या विरोधात गुरुवारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे एका पोलीस अधिकार्यांनी सांगितले.